मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ : पहिल्या T20 मध्ये टीम इंडियाचा थरारक विजय, रोहित-राहुल जोडीची धडाक्यात सुरुवात

IND vs NZ : पहिल्या T20 मध्ये टीम इंडियाचा थरारक विजय, रोहित-राहुल जोडीची धडाक्यात सुरुवात

PHOTO-BCCI

PHOTO-BCCI

पहिल्या टी-20 मध्ये भारताने न्यूझीलंडवर (India vs New Zealand 1st T20) थरारक विजय मिळवला आहे. सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 40 बॉलमध्ये 62 रन केले, सूर्याच्या या खेळीमध्ये 6 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता.

  • Published by:  Shreyas

जयपूर, 17 नोव्हेंबर : पहिल्या टी-20 मध्ये भारताने न्यूझीलंडवर (India vs New Zealand 1st T20) थरारक विजय मिळवला आहे. शेवटच्या 4 ओव्हरमध्ये टीम इंडियाला विजयासाठी फक्त 23 रनची गरज होती, पण न्यूझीलंडने टिच्चून बॉलिंग करत शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच खेचली. किवी टीमने दिलेलं 165 रनचं आव्हान भारताने 5 विकेट गमावून 19.4 ओव्हरमध्ये पार केलं. सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 40 बॉलमध्ये 62 रन केले, सूर्याच्या या खेळीमध्ये 6 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. तर कर्णधार रोहित शर्माने 36 बॉलमध्ये 48 रनची खेळी केली. केएल राहुल आणि रोहित शर्मा या ओपनरनी भारताला 5 ओव्हरमध्येच 50 रनची पार्टनरशीप करून दिली. ऋषभ पंत 17 रनवर नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर टीम साऊदी, मिचेल सॅन्टनर आणि डॅरेल मिचेलला एक विकेट घेण्यात यश आलं.

न्यूझीलंडने टीम इंडियाला (India vs New Zealand 1st T20) विजयासाठी 165 रनचं आव्हान दिलं. टॉस हरल्यानंतर पहिले बॅटिंगला आलेल्या न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 164 रन केले. मार्टिन गप्टीलने (Martin Guptill) 42 बॉलमध्ये 70 रन केले. तर मार्क चॅम्पमन (Mark Champman) 50 बॉलमध्ये 63 रन करून आऊट झाला. भारताकडून भुवनेश्वर कुमार (Bhuvnehswar Kumar) आणि आर.अश्विन (R Ashwin) सगळ्यात यशस्वी ठरले. भुवनेश्वर कुमारने मॅचच्या तिसऱ्याच बॉलला डॅरेल मिचेलला बोल्ड केलं. आयपीएल आणि टी-20 वर्ल्ड कपमध्ये संघर्ष करणाऱ्या भुवनेश्वर कुमारला या मॅचमध्ये सूर गवसला. 4 ओव्हरमध्ये 24 रन देऊन त्याने 2 विकेट घेतल्या, तर अश्विनला 4 ओव्हरमध्ये 23 रनवर 2 विकेट मिळाल्या. मोहम्मद सिराज आणि दीपक चहरला एक विकेट घेण्यात यश आलं.

या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. न्यूझीलंडविरुद्धच्या या तीन टी-20 मॅचच्या सीरिजपासून भारतीय क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात झाली. रोहित शर्मा भारताच्या टी-20 फॉरमॅटचा पूर्णवेळ कॅप्टन झाला आहे, तर राहुल द्रविडची (Rahul Dravid) टीम इंडियाचा मुख्य कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कर्णधार म्हणून खेळत असलेल्या आपल्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्माने टीममध्ये मोठे बदल केले. आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करणारा ऑलराऊंडर व्यंकटेश अय्यरचं (Venkatesh Iyer) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालं आहे. तर दीपक चहर, मोहम्मद सिराज आणि श्रेयस अय्यर यांचं पुनरागमन झालं.

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली. सुपर-12 मध्येच भारताचं आव्हान संपुष्टात आलं. यानंतर आता ऑस्ट्रेलियात होणारा पुढचा टी-20 वर्ल्ड कप अवघ्या 11 महिन्यांवर आला आहे, त्यामुळे रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या नव्या जोडीला नव्याने टीम बांधणी करावी लागणार आहे.

First published:

Tags: New zealand, T20 cricket, Team india