विराटची चूक विंडिजच्या पथ्यावर, भारतावर 8 गडी राखून विजय

विराटची चूक विंडिजच्या पथ्यावर, भारतावर 8 गडी राखून विजय

हेटमायर आणि शाय होप यांच्या शतकांच्या जोरावर विंडिजने भारताविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना 8 गडी राखून जिंकला.

  • Share this:

चेन्नई, 16 डिसेंबर : विंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाला. भारताने दिलेलं 288 धावांचं आव्हान शेमरॉन हेटमायर आणि शाय होप यांच्या शतकांच्या जोरावर विंडीजने सहज पेललं. हेटमायरने 139 धावांची तर शाय होपने नाबाद 102 धावांची खेळी केली. भारताच्या गोलंदाजीचा हेटमायर आणि शाय होपने समाचार घेतला. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 218 धावांची भागिदारी केली.

दरम्यान, विंडिजचा फलंदाज हेटमायरला धावबाद करण्याची संधी भारताचा कर्णधार विराट कोहलीने गमावली. त्यावेळी हेटमायर फक्त 30 धावांवर खेळत होता. त्यानंतर हेटमायरने 109 धावा काढल्या. याचा फटका भारतीय संघाला बसला. शतक झाल्यानंतरही एकदा हेटमायरला जीवदान मिळालं. श्रेयस अय्यरने त्याचा झेल सोडला.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारताने श्रेयस अय्यर-ऋषभ पंत आणि जडेजा-केदार जाधव यांच्या खेळीच्या जोरावर 287 धावा उभारल्या. भारताच्या डावाची सुरुवात अडखळत झाली. शेल्डन कॉट्रेलनं दोन गडी बाद करून भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. पण त्यानंतर भारतीय फलंजाजांनी सावध खेळ करत डाव सावरला.

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा 36 धावांवर बाद झाला. त्याच्याआधी केएल राहुल आणि विराट कोहली लवकर बाद झाले. रोहित शर्मानंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. दोघांनी 114 धावांची भागिदारी केली. ऋषभ पंत 71 तर श्रेयस अय्यर 70 धावांवर बाद झाला. त्यानंतर केदार जाधव आणि रविंद्र जडेजा यांनी अर्धशतकी भागिदारी करत संघाच्या धावसंख्येत भर घातली. विंडीजकडून शेल्डन कॉट्रेल, किमो पॉल आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले तर पोलार्डने एक गडी बाद केला.

Published by: Suraj Yadav
First published: December 16, 2019, 8:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading