Home /News /sport /

IND vs WI : निलंबन ते टीम इंडियात निवड, 12 महिन्यामध्ये असं बदललं नशीब!

IND vs WI : निलंबन ते टीम इंडियात निवड, 12 महिन्यामध्ये असं बदललं नशीब!

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 सीरिजसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची (India vs West Indies) घोषणा केली. यामध्ये राजस्थानचा ऑलराऊंडर दीपक हुड्डाला (Deepak Hooda) स्थान मिळालं आहे. दीपक हुड्डासाठी मागचं एक वर्ष चढ-उताराचं राहिलं.

पुढे वाचा ...
    मुंबई, 27 जानेवारी : वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 सीरिजसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची (India vs West Indies) घोषणा केली. यामध्ये राजस्थानचा ऑलराऊंडर दीपक हुड्डाला (Deepak Hooda) स्थान मिळालं आहे. दीपक हुड्डासाठी मागचं एक वर्ष चढ-उताराचं राहिलं. मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात शिस्तभंग केल्याप्रकरणी हुड्डावर बडोदा क्रिकेट असोसिएशनने संपूर्ण मोसमासाठी बंदी घातली. यानंतर एका वर्षातच हुड्डाचं नशीब बदललं आणि त्याची टीम इंडियात निवड झाली. मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये (Sayed Mushtaq Ali Trophy) बडोद्याच्या पहिल्या सामन्याआधी दीपक हुड्डाचं कर्णधार कृणाल पांड्यासोबत (Krunal Pandya) भांडण झालं. यानंतर दीपक हुड्डा बायो-बबल सोडून निघून गेला. वादानंतर दीपक हुड्डाने बडोदा क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहिलं आणि कर्णधार कृणाल पांड्यावर शिव्या दिल्याचे आणि करियर बरबाद केल्याचे आरोप केले. बडोदा क्रिकेट असोसिएशनने मात्र हुड्डाची ही वर्तणूक शिस्तभंग असल्याचं सांगत त्याचं संपूर्ण मोसमासाठी निलंबन केलं. बडोद्याकडून झालेल्या या कारवाईनंतर दीपक हुड्डा खचला आणि त्याने स्वत:ला एका खोलीमध्ये बंद करून घेतलं. मित्र किंवा कुटंब यांच्यापैकी कोणालाच दीपक भेटत आणि बोलत नव्हता. क्रिकेटचा द एण्ड झाल्याचं त्याला वाटत होतं. पण 26 जानेवारीला त्याचं नशीब पालटलं आणि त्याला थेट टीम इंडियात निवडण्यात आलं. टीम इंडियामध्ये निवड झाल्यानंतर दीपक हुड्डाने स्पोर्ट्सस्टारला प्रतिक्रिया दिली. 'मला यावर विश्वासच बसत नाहीये. माझ्यासाठी मागचं संपूर्ण वर्ष चढ-उताराचं होतं. इरफान पठाण (Irfan Pathan) आणि युसूफ पठाण (Yusuf Pathan) आणि कुटुंबाने मला खूप मदत केली आणि खराब काळातून बाहेर काढलं. त्यांच्यामुळे मी पुन्हा स्वप्न बघायला लागलो. मी ही आनंदाची बातमी शब्दांमध्ये सांगू शकत नाही. हा माझ्या करियरमधला सगळ्यात सुंदर क्षण आहे,' असं दीपक हुड्डा म्हणाला. दीपक हुड्डाला याआधी 2017-18 साली टीम इंडियात निवडण्यात आलं होतं. पण तेव्हा त्याला प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. 'मला आणखी एक संधी मिळायला 5 वर्ष लागली. प्रत्येक मोसमाच्या आधी मी विचार करायचो, यावेळी टीम इंडियात स्थान मिळवायचं, पण असं कधी झालं नाही. प्रत्येकाला संधीची वाट बघावी लागते, हे मी मागच्या एका वर्षात शिकलो,' असं वक्तव्य हुड्डाने केलं. 'या वादानंतर मी कोसळलो होतो, पण इरफान पठाण आणि युसूफ पठाण मला पुन्हा ट्रेनिंगसाठी घेऊन आले. बडोद्यामध्ये ते माझ्यासोबत कित्येक तास नेटमध्ये सराव करायचे. मेंटॉर असल्यामुळे त्यांनी मला फक्त खेळच नाही, तर आयुष्याबाबतही खूप गोष्टी शिकवल्या. त्यांनी दिलेली शिकवण वाईट काळात कामी आली, आणि मला परिपक्व खेळाडू होण्यास मदत झाली,' असं दीपक हुड्डाने सांगितलं. दीपक हुड्डाने आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून चांगली कामगिरी केली. यानंतर त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये बडोद्यासोबत असलेलं 9 वर्षांचं नातं तोडलं आणि राजस्थानकडून खेळायला सुरूवात केली. दीपक हुड्डासाठी हा निर्णय चांगला ठरला. सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये हुड्डाने 6 मॅचमध्ये 294 रन केले. यानंतर राजस्थानने हुड्डाला विजय हजारे ट्रॉफीसाठी (Vijay Hazare Trophy) टीमचं कर्णधार केलं. या स्पर्धेत हुड्डाने कर्नाटकविरुद्ध शतक ठोकत 6 मॅचमद्ये 198 रन केले. हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे टीम इंडियाला वनडेमध्ये फिनिशरची गरज आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात व्यंकटेश अय्यरला संधी देण्यात आली, पण त्याला आपली छाप पाडण्यात यश आलं नाही. हुड्डा मधल्या फळीत कुठेही बॅटिंग करू शकतो, तसंच त्याच्यात मोठे शॉट मारण्याची क्षमता आहे. आयपीएलमध्येही त्याने हे सिद्ध केलं आहे. एवढंच नाही तर हुड्डा ऑफ स्पिन बॉलिंगही करतो. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हुड्डाने 20, टी-20 मध्ये 17 आणि लिस्ट ए मध्ये 35 विकेट घेतल्या आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Team india, West indies

    पुढील बातम्या