मुंबई, 6 जुलै : शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वात भारतीय टीम सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातल्या वनडे सीरिजला 13 जुलैपासून सुरुवात होणार आहे. याआधी भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी वनडे सीरिजसाठी संभाव्य टीमची घोषणा केली आहे. लक्ष्मणने त्याच्या या टीममध्ये दिग्गजांना स्थान दिलेलं नाही.
स्टार स्पोर्ट्ससोबतच्या चर्चेत व्हीव्हीएस लक्ष्मणने (VVS Laxman) ओपनर म्हणून शिखर धवन आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांना निवडलं आहे. लक्ष्मणच नाही तर अनेकांनी श्रीलंकेत हे दोघंच ओपनिंगला खेळतील, असा अंदाज वर्तवला आहे. आयपीएलमध्येही या दोघांनी दिल्लीला जलद सुरुवात करून दिली आहे.
पृथ्वी आणि शिखर यांना ओपनिंगची संधी मिळाली, तर मात्र देवदत्त पडिक्कलला (Devdutt Padikkal) बाहेर बसावं लागू शकतं. देवदत्तने विजय हजारे ट्रॉफीमध्ये धमाकेदार कामगिरी केली. 7 मॅचमध्ये त्याने तब्बल 737 रन केले, यातल्या प्रत्येक इनिंगमध्ये पडिक्कलला 50 पेक्षा जास्तचा स्कोअर करण्यात यश आलं. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने 4 शतकं आणि 3 अर्धशतकं केली. पण याच स्पर्धेत पृथ्वी शॉने सर्वाधिक 827 रन केले. पडिक्कल सर्वाधिक रन करणाऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
लक्ष्मणने तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव, चौथ्या क्रमांकावर संजू सॅमसन, पाचव्या क्रमांकावर मनिष पांडे यांना संधी दिली आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाड, नितीश राणा आणि इशान किशन यांना बाहेर बसावं लागेल. इशान किशनने आपल्या पहिल्याच टी-20 मध्ये इंग्लंडविरुद्ध धडाकेबाज अर्धशतक केलं होतं. नितीश राणाला अजून आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पणाची संधी मिळालेली नाही.
ऑलराऊंडर म्हणून लक्ष्मणने हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याला तर स्पिन बॉलिंगची जबाबदारी युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादवला दिली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या दोघांची कामगिरी निराशाजनक झाली आहे. फास्ट बॉलर म्हणून लक्ष्मणच्या टीममध्ये भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहर आहेत, म्हणजेच डावखुरा फास्ट बॉलर चेतन सकारियालाही लक्ष्मणने संधी दिली नाही. इरफान पठाणने मात्र जर हार्दिक बॉलिंग करणार असेल, तर मी कृणालऐवजी नितीश राणाला खेळवीन, असं मत मांडलं.
लक्ष्मणची टीम
शिखर धवन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India Vs Sri lanka, Team india