• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs SL : द्रविड म्हणतो सगळ्यांना संधी देणं शक्य नाही, या खेळाडूंचा पत्ता कट?

IND vs SL : द्रविड म्हणतो सगळ्यांना संधी देणं शक्य नाही, या खेळाडूंचा पत्ता कट?

टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी (India vs Sri Lanka) रवाना झाली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 28 जून : टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी (India vs Sri Lanka) रवाना झाली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात युएईमध्ये टी-20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup) आयोजन होणार आहे, त्याआधी भारताची ही शेवटची टी-20 सीरिज आहे, त्यामुळे या दौऱ्यात युवा खेळाडू चांगली कामगिरी करून निवड समितीचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील. शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वात भारतीय टीम श्रीलंकेत खेळणार आहे, तर प्रशिक्षकपदाची जबाबदारी राहुल द्रविडकडे (Rahul Dravid) देण्यात आली आहे. श्रीलंकेला रवाना होण्याआधी राहुल द्रविडने सीरिजमध्ये सगळ्या युवा खेळाडूंना संधी देणं शक्य नसल्याचं म्हणलं, त्यामुळे आता कोणाला बाहेर बसावं लागणार अशी चर्चा सुरू झाली आहे. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांनी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सला चांगली सुरुवात करून दिली, त्यामुळे ओपनर म्हणून हे दोघंच खेळतील, हे जवळपास निश्चित आहे. पडिक्कल-ऋतुराजचं काय? जर पृथ्वी शॉ ओपनिंगला खेळणार असेल तर मग देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांना संधी कशी मिळणार, असा प्रश्न आहे. पडिक्कल आणि ऋतुराज या दोन्ही ओपनरनी आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) आणि मनिष पांडे (Manish Pandey) यांच्यात स्पर्धा असेल. सूर्यकुमार यादवने इंग्लंड सीरिजमध्ये चांगली कामगिरी केली होती, त्यामुळे त्याला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळू शकते. चेतन सकारियालाही संधी नाही? डावखुरा फास्ट बॉलर चेतन सकारिया (Chetan Sakaria) याने आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी करत लक्ष वेधून घेतलं. पण भुवनेश्वर कुमार, दीपक चहर आणि नवदीप सैनी असताना सकारियाला संधी मिळणं कठीण आहे. याशिवाय कृष्णप्पा गौतमलाही (Krishnappa Gowtham) बाहेरच बसावं लागू शकतं, कारण टीममध्ये डावखुरा ऑलराऊंडर कृणाल पांड्या (Krunal Pandya) आहे. कृणाल जर टीममध्ये असेल तर कुलदीप यादवलाही (Kuldeep Yadav) अंतिम-11 मध्ये खेळवण्यात अडचणी निर्माण होतील. चहल का चहर? इंग्लंडविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजमधल्या पहिल्या 3 मॅचमध्ये लेग स्पिनर युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) संधी देण्यात आली होती, पण तो सपशेल अपयशी ठरला. यानंतर अखेरच्या दोन मॅचमध्ये राहुल चहरला (Rahul Chahar) खेळवण्यात आलं. मिळालेल्या या संधीचं राहुलने सोनं केलं. त्यामुळे आता टीमला चहर आणि चहल यांच्यापैकी एकालाच खेळवता येईल. हार्दिक पांड्या टी-20 स्पेशलिस्ट आहे, त्यामुळे त्याचं खेळणं निश्चित आहे. तसंच इशान किशन आणि संजू सॅमसन यांनीही टी-20 क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. वरुण चक्रवर्तीलाही मिस्ट्री स्पिनर असल्यामुळे मैदानात उतरवलं जाऊ शकतं. श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय टीम शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नीतीश राणा, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), युझवेंद्र चहल, राहुल चाहर, के गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उप-कर्णधार), दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया भारत-श्रीलंका सीरिजचं वेळापत्रक पहिली वनडे- 13 जुलै- कोलंबो, दुपारी 2.30 वाजता दुसरी वनडे- 16 जुलै- कोलंबो, दुपारी 2.30 वाजता तिसरी वनडे- 18 जुलै- कोलंबो, दुपारी 2.30 वाजता टी-20 सीरिज पहिली टी-20 - 21 जुलै- कोलंबो, संध्याकाळी 7 वाजता दुसरी टी-20- 23 जुलै- कोलंबो, संध्याकाळी 7 वाजता तिसरी टी-20- 25 जुलै- कोलंबो, संध्याकाळी 7 वाजता
  Published by:Shreyas
  First published: