कोलंबो, 14 जुलै : श्रीलंका क्रिकेटमधले (Sri Lanka Cricket) वाद काही संपण्याचं नाव घेत नाहीयेत. आधी खेळाडूंनी करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यामुळे खेळाडू आणि बोर्डातला तणाव वाढला होता, यानंतर टीममधल्या सदस्यांना कोरोनाची (Corona Virus) लागण झाली, त्यामुळे भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातली सीरिज पाच दिवसांनी पुढे ढकलावी लागली. यानंतर आता श्रीलंका क्रिकेट बोर्ड टीमचे बॅटिंग प्रशिक्षक ग्रॅण्ट फ्लॉवर (Grant Flower) यांची चौकशी करणार आहेत. ग्रॅण्ट फ्लॉवर यांना कोरोनाची लागण कशी झाली, ते कोणाच्या संपर्कात आले आणि इंग्लंडमध्ये त्यांनी नियमांचं उल्लंघन केलं का, याची चौकशी केली जाणार आहे.
फ्लॉवर यांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर त्यांची चौकशी केली जाणार आहे. इंग्लंडहून परतल्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. सगळ्या खेळाडूंना कोलंबोच्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं. इंग्लंड दौऱ्यावरून परतल्यानंतर फ्लॉवर यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली.
श्रीलंका टीमच्या मेडिकल स्टाफने इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना सांगितलं, 'फ्लॉवर यांना कोरोनाची लागण कशी झाली, याचा तपास करावा लागेल.' फ्लॉवर आणि डेटा एनलिस्ट जीटी निरोशन यांच्याशिवाय कोणत्याही खेळाडूला कोरोना झाला नाही. तरीही इंग्लंड दौऱ्याहून परतलेल्या खेळाडूंना आणखी एका आरटीपीसीआर टेस्टमधून जावं लागणार आहे.
13 जुलैपासून भारत-श्रीलंका वनडे सीरिजला सुरुवात होणार होती, पण श्रीलंकेच्या टीममध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे आता ही सीरिज 18 जुलैपासून होणार आहे. या दौऱ्यात भारतीय टीम तीन वनडे आणि तीन टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. शिखर धवनकडे टीम इंडियाचं नेतृत्व देण्यात आलं आहे.
श्रीलंका दौऱ्यात भारतीय टीम तीन वनडेमधली पहिली वनडे 18 जुलैला खेळेल. तर 25 जुलैपासून तीन टी-20 मॅचच्या सीरिजला सुरुवात होईल. सीरिजच्या सगळ्या मॅच कोलंबोच्या आर.प्रेमदासा स्टेडियममध्य खेळवल्या जाणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Cricket, Sri lanka