Home /News /sport /

IND vs SL, 2nd T20 : रोमांचक सामन्यात टीम इंडियाचा पराभव, श्रीलंकेचा सीरिजमध्ये कमबॅक

IND vs SL, 2nd T20 : रोमांचक सामन्यात टीम इंडियाचा पराभव, श्रीलंकेचा सीरिजमध्ये कमबॅक

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये श्रीलंकेचा (India vs Sri Lanka 2nd T20) 4 विकेट आणि 2 बॉलने रोमांचक विजय झाला आहे. भारताने दिलेलं 133 रनचं आव्हान पार करताना श्रीलंकेने 19.4 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावल्या.

    कोलंबो, 28 जुलै : भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये श्रीलंकेचा (India vs Sri Lanka 2nd T20) 4 विकेट आणि 2 बॉलने रोमांचक विजय झाला आहे. भारताने दिलेलं 133 रनचं आव्हान पार करताना श्रीलंकेने 19.4 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावल्या. भारताच्या या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली, तसंच त्यांना वारंवार धक्केही लागत होते, पण धनंजय डिसिल्वाच्या (Dhananjaya De Silva) नाबाद खेळीमुळे श्रीलंकने हे आव्हान पार केलं. डिसिल्वाने 34 बॉलमध्ये नाबाद 40 रन केले, तर चामिका करुणारत्नेने (Chamika Karunaratne) 6 बॉलमध्ये नाबाद 12 रनची महत्त्वाची खेळी केली. याशिवाय मिनोद भानुका 31 बॉलमध्ये 36 रन करून आऊट झाला. भारताकडून कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर भुवनेश्वर कुमार, चेतन सकारिया, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सामन्यात शिखर धवनने फास्ट बॉलर असलेल्या नवदीप सैनीला एकही ओव्हर दिली नाही. या विजयाबरोबरच श्रीलंकेच्या टीमने टी-20 सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी केली आहे. आता सीरिजची अखेरची मॅच गुरुवारी खेळवण्यात येणार आहे. भारतीय बॅट्समनना (India vs Sri Lanka 2nd T20) मोठा स्कोअर करण्यात अपयश आलं. टॉस जिंकून श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने भारताला पहिले बॅटिंगला पाठवलं, यानंतर टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 132 रन केले. कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) सर्वाधिक 40 रनची खेळी केली, तर आपली पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच खेळणाऱ्या देवदत्त पडिक्कलला 29 रन आणि ऋतुराज गायकवाडला 21 रन करता आले. श्रीलंकेकडून अकिला धनंजयाला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या, तर दुष्मंता चमीरा, वानिंदु हसरंगा आणि दसून शनाका यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. कृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याच्या संपर्कात आलेले 8 खेळाडू या सीरिजमधून बाहेर झाले आहेत, त्यामुळे टीम इंडियाला उपलब्ध असलेल्या 11 खेळाडूंना मैदानात उतरावं लागलं. या सामन्यात टीम इंडियामध्ये 5 बॅट्समन आणि 6 बॉलर्स होते. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal), नितीश राणा (Nitish Rana) आणि चेतन सकारिया (Chetan Sakariya) यांचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India Vs Sri lanka, T20 cricket

    पुढील बातम्या