कोलंबो, 28 जुलै: टीम इंडियाचा ऑल राऊंडर कृणाल पांड्या (Krunal Pandya) मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला, यानंतर भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातली दुसरी टी-20 स्थगित करण्यात आली. दिलासादायक बाब म्हणजे कृणालच्या संपर्कात आलेल्या दुसऱ्या भारतीय खेळाडूंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे, त्यामुळे आता दुसरी टी-20 आज खेळवण्यात येणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे कृणाल टी-20 सीरिजमधून बाहेर झाला आहे. तो पुढचे 7 दिवस आयसोलेशनमध्ये असणार आहे. यानंतर त्याची पुन्हा आरटी-पीसीआर टेस्ट होईल.
कृणाल पांड्या टी-20 सीरिजमधून बाहेर झाल्यामुळे आता टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये बदल होणार आहे. कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंनाही आयसोलेट करण्यात आलं आहे, त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी कोणताही धोका टाळण्यासाठी हे खेळाडूही टी-20 सीरिजमधून बाहेर झाल्याचं वृत्त आहे.
'इनसाईड स्पोर्ट्स'च्या बातमीनुसार पृथ्वी शॉ (Prithvi Shaw), हार्दिक पांड्या (Hardik Pandya), इशान किशन (Ishan Kishan), देवदत्त पडिक्कल आणि कृष्णप्पा गौतम हे भारतीय खेळाडू श्रीलंका विरुद्धची उर्वरित सीरिज खेळणार नाहीत. हे सर्वजण कृणालच्या संपर्कात होते, अशी माहिती आहे. जर हे सगळे खेळाडू टीममधून बाहेर झाले, तर मात्र शिखर धवन आणि राहुल द्रविड यांना टीम निवडताना अडचणी निर्माण होऊ शकतात.
राहुल चहर-कुलदीप पर्याय
टीम इंडियाकडे स्पिन बॉलर म्हणून राहुल चहर (Rahul Chahar) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) हे दोन पर्याय आहेत. युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) हा लेग स्पिनर आधीच टीममध्ये असल्यामुळे राहुल चहरची टीममध्ये निवड होणं कठीण आहे. तसंच अतिरिक्त बॉलर खेळवला, तर भारताचा बॅट्समन कमी होईल.
कृणालच्या संपर्कात आलेले खेळाडू जर सीरिजमधून बाहेर झाले, तर महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते. ऋतुराजने आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून चांगली कामगिरी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, India Vs Sri lanka, Krunal Pandya, T20 cricket