कोलंबो, 7 जुलै : श्रीलंका क्रिकेट बोर्ड (Sri Lanka Cricket Board) आणि त्यांच्या क्रिकेटपटूंमध्ये करारावरुन सुरू असलेल्या वादाने वेगळं वळण घेतलं आहे. टीमचा दिग्गज ऑलराऊंडर एन्जलो मॅथ्यूज (Angelo Mathews) याने संन्यास घेण्याचे संकेत दिले आहेत. भारताविरुद्ध 13 जुलैपासून सुरू होणाऱ्या सीरिजआधी श्रीलंका क्रिकेटमध्ये नवा वाद उफाळून आला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने नव्या करारातून टीमचा सगळ्यात वरिष्ठ खेळाडू एन्जलो मॅथ्यूज आणि टेस्ट टीमचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेला बाहेर ठेवलं आहे. मॅथ्यूजने श्रीलंका क्रिकेट प्रशासनाला पत्र लिहिलं आहे आणि आपण संन्याय घ्यायचा विचार करत असल्याचं सांगितलं. पुढच्या काही दिवसांमध्ये आपण याची घोषणा करू, असं मॅथ्यूज म्हणाला आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने प्रत्येक दौऱ्याच्या आधारावर खेळाडूंची करार करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंसोबत वार्षिक करार केला जाणार नाही, असं सूत्रांनी सांगितलं. भारताविरुद्धच्या सीरिजसाठी खेळाडूंना करारावर स्वाक्षरी करायला 8 जुलैपर्यंतची वेळ दिली आहे. सुरुवातीला या करारावर स्वाक्षरी करायला तयार नसलेले खेळाडूंनीही आता स्वाक्षरी केली आहे.
कामगिरीच्या आधारावर 24 खेळाडूंना चार श्रेणींमध्ये विभागण्यात आलं आहे. 6 खेळाडूंना ग्रेड ए मध्ये स्थान मिळालं आहे, ज्यांना वर्षाला 70 हजार ते 1 लाख डॉलर मिळतील. श्रीलंकन टीम करारावर स्वाक्षरी न करताच इंग्लंड दौऱ्यावर गेली होती.
श्रीलंकेच्या 30 पैकी 29 क्रिकेटपटूंनी नव्या करारावर स्वाक्षरी केली आहे. याच खेळाडूंची भारताविरुद्धच्या सीरिजसाठी निवड केली जाणार आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय टीम
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया
नेट बॉलर : इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर, सिमरजीत सिंग
भारत-श्रीलंका सीरिजचं वेळापत्रक
पहिली वनडे- 13 जुलै- कोलंबो, दुपारी 2.30 वाजता
दुसरी वनडे- 16 जुलै- कोलंबो, दुपारी 2.30 वाजता
तिसरी वनडे- 18 जुलै- कोलंबो, दुपारी 2.30 वाजता
टी-20 सीरिज
पहिली टी-20 - 21 जुलै- कोलंबो, संध्याकाळी 7 वाजता
दुसरी टी-20- 23 जुलै- कोलंबो, संध्याकाळी 7 वाजता
तिसरी टी-20- 25 जुलै- कोलंबो, संध्याकाळी 7 वाजता
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India Vs Sri lanka, Team india