Home /News /sport /

IND vs SL: आकाश चोप्राने केली रणतुंगाची बोलती बंद, टीम इंडियाबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

IND vs SL: आकाश चोप्राने केली रणतुंगाची बोलती बंद, टीम इंडियाबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुना रणतुंगाने (Arjuna Ranatunga) टीम इंडियाबाबत (Team India) केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा आकाश चोप्राने (Aakash Chopra) समाचार घेतला आहे.

    मुंबई, 4 जुलै: श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुना रणतुंगाने (Arjuna Ranatunga) टीम इंडियाबाबत (Team India) केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा आकाश चोप्राने (Aakash Chopra) समाचार घेतला आहे. आकाश चोप्राने रणतुंगाच्या जखमेवर मीठ चोळलं आणि त्याची बोलती बंद केली आहे. भारताने श्रीलंकेत दुय्यम दर्जाची टीम पाठवली आहे, हा श्रीलंका क्रिकेटचा अपमान आहे, असं रणतुंगा म्हणाला होता. 'भारतीय टीममध्ये बुमराह, शमी, विराट आणि रोहितसारखे खेळाडू नाही, हे मान्य आहे पण तुम्हाला ही आमची बी टीम दिसते का?' असा सवाल आकाश चोप्राने विचारला आहे. श्रीलंकेच्या टीमला पहिले आपल्या सध्याच्या कामगिरीवर लक्ष द्यायची गरज आहे, असा टोलाही आकाश चोप्राने त्याच्या युट्यूब व्हिडिओमध्ये मांडला. 'अफगाणिस्तानला टी-20 वर्ल्ड कप क्वालिफायर (T20 World Cup Qualifier) खेळायची गरज नाही, पण तुम्हाला खेळावी लागणार आहे. श्रीलंकेची क्रिकेट टीम एवढा संघर्ष करत आहे. इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमधून तुम्हाला याचा अंदाज येईल. श्रीलंकेला सुपर-12 मध्येही कदाचित स्थान मिळणार नाही. हे सत्य आहे की अफगाणिस्तान आधीच टी-20 वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय झालं आहे,' असं आकाश चोप्रा म्हणाला. 'श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरिजमध्ये भारताच्या संभाव्य-11 खेळाडूंकडे 471 वनडे सामन्यांचा अनुभव आहे आणि ही आमची पहिली टीम नाही. श्रीलंका जेव्हा आपली टीम निवडेल तेव्हा त्यांच्या खेळाडूंकडे किती वनडेचा अनुभव असेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. जेव्हा आमचा अनुभव आणि तुमचा अनुभव याची तुलना होईल, तेव्हा ही लढाई पाहणं मजेशीर असेल,' अशी प्रतिक्रिया आकाश चोप्राने दिली. भारताचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर आहेत, त्यामुळे श्रीलंकेला नवोदितांना संधी देण्यात आली, यावर श्रीलंकेला 1996 सालचा वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या रणतुंगाने आक्षेप घेतला. याबाबत त्याने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला दोष दिला. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मात्र रणतुंगाच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. भारतीय टीममधल्या 20 पैकी 14 जणांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं आहे. ही टीम दुय्यम दर्जाची नाही, असं स्पष्टीकरण श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून देण्यात आलं. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज खेळणार असल्यामुळे शिखर धवनला (Shikhar Dhawan) श्रीलंका दौऱ्यासाठी कर्णधार बनवण्यात आलं आहे, तर राहुल द्रविड (Rahul Dravid) टीमचा मुख्य प्रशिक्षक आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, India Vs Sri lanka, Team india

    पुढील बातम्या