मुंबई, 18 मे : आयपीएल 2022 संपल्यानंतर (IPL 2022) टीम इंडिया लगेचच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa) 5 टी-20 मॅचची सीरिज (T20 Series) खेळणार आहे. या सीरिजवेळीच टीम इंडिया इंग्लंडलाही (India vs England) रवाना होणार आहे, त्यामुळे दोन्ही सीरिजसाठी वेगवेगळ्या टीमची निवड होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राहुल द्रविड (Rahul Dravid) टेस्ट टीमसोबत इंग्लंडला जाणार असल्यामुळे दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी टीम इंडियाचा कोच कोण असेल? हा प्रश्न उपस्थित झाला होता, पण यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मणचं (VVS Laxman) नाव पुढे आलं आहे. लक्ष्मण दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या कोचची भूमिका पार पाडू शकतो.
इनसाईड स्पोर्ट्सशी बोलताना बीसीसीआय (BCCI) अधिकारी म्हणाला, 'आम्हाला बर्मिंघम टेस्टआधी 24 जूनला लिस्टरशायरविरुद्ध सराव सामना खेळायचा आहे. राहुल द्रविड 15 किंवा 16 जूनला टीमसोबत रवाना होईल, त्यामुळे आम्ही दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी लक्ष्मणला टीमसोबत जायला सांगू.'
शिखर धवन कर्णधार?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजसाठी सीनियर खेळाडूंना आराम दिला जाणार आहे, त्यामुळ चेतन शर्मा यांच्या नेतृत्वातली निवड समिती युवा खेळाडूंना संधी देईल. याशिवाय आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक यांचंही टीममध्ये कमबॅक होऊ शकतं. तर शिखर धवनला कॅप्टन्सी दिली जाण्याची शक्यता आहे. मागच्यावर्षीही टीम इंडिया इंग्लंडमध्ये असताना भारताची एक टीम श्रीलंका दौऱ्यावर गेली होती, तेव्हा शिखर धवनला दुसऱ्या टीमचं नेतृत्व देण्यात आलं होतं.
या खेळाडूंना आराम
रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांना दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी आराम दिला जाऊ शकतो, पण हे सगळे खेळाडू इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होतील. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजसाठी ऋतुराज गायकवाड, इशान किशन, उमरान मलिक आणि जितेश शर्मा यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 9-19 जून दरम्यान 5 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे.
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.