Home /News /sport /

IND vs SA : 'फक्त रहाणे, पुजाराच का, कॅप्टनही...', विराटच्या सहकाऱ्यानेच साधला निशाणा

IND vs SA : 'फक्त रहाणे, पुजाराच का, कॅप्टनही...', विराटच्या सहकाऱ्यानेच साधला निशाणा

चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी (Team India) चिंतेचा विषय आहे. अनेक क्रिकेट रसिक आणि माजी क्रिकेटपटूंनी पुजारा आणि रहाणेला टीमबाहेर करण्याची मागणी केली आहे.

    मुंबई, 4 जानेवारी : चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी (Team India) चिंतेचा विषय आहे. अनेक क्रिकेट रसिक आणि माजी क्रिकेटपटूंनी पुजारा आणि रहाणेला टीमबाहेर करण्याची मागणी केली आहे. पण भारताचा माजी फास्ट बॉलर आशिष नेहरा (Ashish Nehra) याने मात्र वेगळं मत मांडलं आहे. विराट कोहलीची (Virat Kohli) कामगिरीही पुजारा आणि रहाणेसारखीच आहे, असं नेहरा म्हणाला. आशिष नेहरा हा विराट कोहलीचा सहकारी होता, त्याने विराट आणि नेहरा यांनी दिल्लीकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलं, याशिवाय दोघं भारतीय टीममध्येही एकत्र होते. तसंच आशिष नेहरा विराटच्या कॅप्टन्सीमध्ये आरसीबीचा बॉलिंग प्रशिक्षकही होता. क्रिकबझसोबत बोलताना आशिष नेहरा म्हणाला, 'विराट कोहलीचे आकडेही एवढेच आहेत, पण कोणीच विराटच्या जागेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीत. कारण तो कर्णधार आहे आणि इतर दोन खेळाडूंपेक्षा तो वेगळ्या स्तरावर आहे. तुलना करणं योग्य नाही, पण रहाणे आणि पुजाराही फॉर्ममध्ये होते, तेव्हा कोणाच्याही मागे नव्हते.' विराट कोहलीने 2019 साली शेवटचं शतक केलं आहे. 2020 पासून विराटने टेस्टमध्ये फक्त 26.08 च्या सरासरीनेच रन केल्या आहेत. तर रहाणे आणि पुजाराची सरासरीही याच कालावधीमध्ये 25 च्या आसपास आहे. 2019 च्या अखेरीस टेस्टमध्ये 54.01 ची सरासरी असलेला विराट 2021 संपेपर्यंत 50.34 च्या सरासरीवर आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टेस्टच्या दोन इनिंगमध्ये विराटने 35 आणि 18 रन केले. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनीही जोहान्सबर्ग टेस्टची दुसरी इनिंग पुजारा आणि रहाणेसाठी अखेरची संधी ठरू शकते, अशी शक्यता वर्तवली होती. पण नेहराने मात्र या दोघांनाही तिसऱ्या टेस्टमध्येही खेळवणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 'जर तुम्ही पहिल्या टेस्टमध्ये रहाणेचं समर्थन केलं असेल, तर उरलेल्या सीरिजसाठीही त्याला साथ देणं गरजेचं आहे. न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टेस्टमध्ये दुखापतीमुळे रहाणे टीमबाहेर गेला होता, तेव्हा विराटचं टीममध्ये पुनरागमन झालं होतं. पण पहिल्या टेस्टमध्ये रहाणेने नेतृत्व केलं होतं,' असं वक्तव्य नेहराने केलं. 'रहाणे आणि पुजारा अडचणीत आहेत, हे मान्य आहे. पण महत्त्वाच्या सीरिजवेळी मध्येच खेळाडू बदलणं मोठा निर्णय आहे,' असही नेहरा म्हणाला. रहाणे आणि पुजाराचं भविष्य काय आहे? हे फक्त टीम प्रशासन आणि निवड समितीलाच माहिती आहे, पण या दोघांकडे आता जास्त वेळ शिल्लक नाही, हे निश्चित आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ajinkya rahane, Pujara, South africa, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या