मुंबई, 24 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) संपल्यानंतर लगेचच भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात 5 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे. 9 जूनपासून या सीरिजला सुरूवात होईल, पण टीम इंडियातून रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर केएल राहुलला टीमचं कर्णधार करण्यात आलं आहे.
टी-20 टीममध्ये अनेक बड्या नावांचं पुनरागमन झालं आहे, यामध्ये हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांचा समावेश आहे. आयपीएल 2022 मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांची टीम इंडियामध्ये पहिल्यांदाच निवड झाली आहे.
आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्यानंतरही शिखर धवनला (Shikhar Dhawan) डावलण्यात आलं आहे, त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं, पण याबाबत आता नवी माहिती समोर आली आहे. टीमची निवड व्हायच्या आधी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) स्वत: शिखर धवनला फोन केला आणि तुझी टीममध्ये निवड होत नसल्याचं सांगितलं.
बीसीसीआयच्या एका सीनियर अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिल्याचं वृत्त इनसाईड स्पोर्ट्सने दिलं आहे. 'शिखर धवनने एक दशक भारतीय क्रिकेटची सेवा केली, पण टी-20 मध्ये युवा खेळाडूंना संधी दिली गेली पाहिजे. राहुलला हा कठीण निर्णय घ्यायचा होता आणि सगळे त्याच्याशी सहमत होते. टीम निवडीच्या आधी द्रविडने शिखर धवनला फोन केला आणि ही माहिती दिली,' असं अधिकारी म्हणाला.
'प्लान सरळ आहे, जेव्हा तुमच्याकडे ऋतुराज गायकवाड, इशान किशन, केएल राहुल आणि संजू सॅमसनसारखे टॉप ऑर्डरचे खएळाडू आहेत, तेव्हा तुमच्यासाठी या गोष्टी कठीण होतात. आपल्याला काय करायचं आहे, याची स्पष्टता द्रविडकडे आहे. आम्ही सगळे शिखर धवनचा सन्मान करतो, याच कारणामुळे आम्ही धवनला फोन करून ही माहिती दिली. तो आमच्या टी-20 टीमच्या योजनेत नाही,' असं वक्तव्य बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने केलं.
दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी टीम इंडिया
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.