केपटाऊन, 13 जानेवारी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये (India vs South Africa 3rd Test) ऋषभ पंतने (Rishabh Pant) पुन्हा त्याचे जुने रंग दाखवले. पंतने 58 बॉलमध्येच त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने ही खेळी जेव्हा केली जेव्हा भारताने दिवसाच्या पहिल्या दोन ओव्हरमध्येच चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेची विकेट गमावली होती. दोन विकेट लवकर गेल्यानंतर टीम इंडियापुढे लवकर ऑलआऊट व्हायचं संकट उभं ठाकलं होतं पण पंतने विराटच्या (Virat Kohli) मदतीने भारताची बॅटिंग सावरली. एकीकडे विराट झुंज देत असतानाच ऋषभ पंत दक्षिण आफ्रिकेच्या बॉलिंगवर आक्रमण करत होता.
लंचआधी जेव्हा विराटसह इतर भारतीय खेळाडूंनी 96 रन करून 22 रन केले, तिकडे एकट्या पंतने 60 बॉलमध्येच 51 रन ठोकले. पंतने 85 च्या स्ट्राईक रेटने रन केले. पंत आणि विराट यांच्यात लंचपर्यंत पाचव्या विकेटसाठी 147 बॉलमध्ये 72 रनची पार्टनरशीप झाली.
ऋषभ पंत जोहान्सबर्गमधल्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये खराब शॉट मारून शून्य रनवर आऊट झाला होता. यानंतर त्याच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकरदेखील कॉमेंट्री करताना ऋषभ पंतच्या त्या शॉटवर चांगलेच भडकले होते. तसंच विराट कोहली आणि राहुल द्रविड यांनीही पंतच्या त्या शॉटबाबत नाराजी व्यक्त केली होती.
केपटाऊन टेस्टच्या एक दिवस आधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराट कोहलीला ऋषभ पंतच्या त्या शॉटबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना विराटने एमएस धोनीने (MS Dhoni) त्याला दिलेला सल्ला सांगितला. 'तुमच्या पहिल्या आणि दुसऱ्या चुकीमध्ये सात ते आठ महिन्यांचं अंतर असलं पाहिजे. तेव्हाच तुमचं करियर जास्त काळ चालू शकतं, असं धोनीने मला सांगितलं होतं. ऋषभही असंच करतो, तो यामध्ये सुधारणा करेल, याचा मला विश्वास आहे,' असं विराट म्हणाला होता.
कर्णधार विराट कोहलीने सांगितलेला एमएस धोनीचा हा गुरूमंत्र ऋषभ पंतच्या कामाला आला. केपटाऊन टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये पंतने आक्रमक बॅटिंग केली असली तरी त्याने बॉल पाहून शॉट मारले. पंतने लागोपाठ दुसऱ्यांदा विराटसोबत 50 रनची पार्टनरशीप केली. याआधी पहिल्या इनिंगमध्येही दोघांमध्ये 113 बॉलमध्ये 51 रनची पार्टनरशीप झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MS Dhoni, Rishabh pant, South africa, Team india, Virat kohli