केपटाऊन, 14 जानेवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa 3rd Test) यांच्यातल्या निर्णायक टेस्टच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. मॅचच्या चौथ्या दिवशी आफ्रिकेचं पारडं जड आहे. दक्षिण आफ्रिकेने चौथ्या दिवसाची सुरूवात 101/2 अशी केली आहे. कीगन पीटरसन (Keegan Petersen) 48 रनवर नाबाद खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी आणखी 111 रनची गरज आहे, त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी भारताला चमत्कार घडवावा लागणार आहे. भारतासाठी दिलासादयक बाब म्हणजे विराट कोहली (Virat Kohli) कर्णधार असताना विरोधी टीमचा 139 पेक्षा जास्त आव्हानाचा पाठलाग करताना कधीच विजय झालेला नाही.
मॅचच्या तिसऱ्या दिवशी ऋषभ पंतच्या नाबाद शतकामुळे भारताचा 198 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 212 रनचं आव्हान मिळालं. ऋषभ पंतच्या नाबाद 100 रन वगळता कोणत्याही भारतीय खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. पंतशिवाय विराट कोहलीने (Virat Kohli) 29 रन केले.
भारताला अजून दक्षिण आफ्रिकेत एकदाही टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. या दौऱ्यातल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा विजय झाला, यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेने जोरदार पुनरागमन करत सीरिज बरोबरीत आणली. आता तिसऱ्या टेस्टमध्येही दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड वाटत आहे, त्यामुळे यंदाही भारताचं टेस्ट सीरिज जिंकण्याचं स्वप्न अधुरंच राहणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.