कटक, 13 जून : टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन्ही टी-20 सामन्यामध्ये (India vs South Africa 2nd T20) दारूण पराभव झाला, त्यामुळे भारतीय टीम 5 टी-20 मॅचची ही सीरिज गमावण्याच्या उंबरठ्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा कटकमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 4 विकेटने विजय झाला, याचसोबत आफ्रिकेने सीरिजमध्ये 2-0 ने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय बॅट्समन अपयशी ठरले, पण कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) वापरलेल्या रणनितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या मॅचमध्ये दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) आधी अक्षर पटेलला (Axar Patel) बॅटिंगला पाठवण्यात आलं.
आरसीबीने आयपीएल 2022 मध्ये दिनेश कार्तिकसाठी याच रणनितीचा वापर केला होता. दिनेश कार्तिकचा वापर आरसीबीने फिनिशर म्हणून केला, ज्यामुळे त्याला 15व्या ओव्हर दरम्यानच बॅटिंगला पाठवण्यात आलं. ऋषभ पंतनेही दिनेश कार्तिकला त्याच पद्धतीने वापरायचा निर्णय घेतला, पण याचा फटका टीम इंडियाला बसला.
13 व्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याची विकेट गेल्यानंतर अक्षर पटेल बॅटिंगसाठी मैदानात आला, पण त्याला संघर्ष करावा लागला. 11 बॉलमध्ये 10 रन करून तो आऊट झाला. दिनेश कार्तिकने शेवटच्या दोन ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या बॉलिंगवर आक्रमण केल्यामुळे भारताचा स्कोअर 148 पर्यंत झाला. कार्तिकने 21 बॉलमध्ये नाबाद 30 रनची खेळी केली. कार्तिकला जर अक्षर पटेलआधी बॅटिंगची संधी मिळाली असती तर भारताचा स्कोअर आणखी जास्त व्हायची शक्यता होती.
श्रेयस अय्यरने केला बचाव
दिनेश कार्तिकला अक्षर पटेलनंतर बॅटिंगची संधी मिळाल्यानंतर ऋषभ पंतच्या कॅप्टन्सीवर टीका होत आहे, पण श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) मात्र त्याच्या या निर्णयाच समर्थन केलं आहे. आम्ही आधीही अशी रणनिती अवलंबली आहे, अक्षर जेव्हा क्रीजवर होता तेव्हा सात ओव्हर शिल्लक होत्या. तो एक-दोन रन काढून स्ट्राईक रोटेट करू शकतो, असं श्रेयस अय्यर म्हणाला.
'कार्तिकलाही सुरूवातीला रन काढताना अडचणींचा सामना करावा लागला. या सामन्यात खेळपट्टीने महत्त्वाची भूमिका बजावली. आम्ही पुढेही ही रणनिती वापरू. या सामन्यात आम्ही 160 रन केल्या असत्या तर आफ्रिकेवर दबाव टाकता आला असता, पण आम्ही 12 रननी कमी पडलो,' अशी प्रतिक्रिया अय्यरने दिली. सीरिजची तिसरी टी-20 मॅच 14 जूनला विशाखापट्टणमला होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Rishabh pant, South africa, T20 cricket, Team india