सेंच्युरियन, 27 डिसेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa 1st Test day 2) यांच्यातल्या पहिल्या टेस्टचा आजचा दुसरा दिवस आहे, पण सेंच्युरियनमध्ये सकाळपासून पाऊस पडत आहे, त्यामुळे सामना वेळेत सुरू होण्याची शक्यता कमी आहे. तसंच हवामान खात्याने दिवसभर वातावरण असंच राहिल, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी उत्कृष्ट बॅटिंग केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पावसाचा खेळ बघायला मिळू शकतो.
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताने दिवसाअखेर 272/3 एवढा स्कोअर केला. केएल राहुल (KL Rahul) 122 रनवर तर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 40 रनवर नाबाद खेळत आहेत. केएल राहुल आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) या दोन्ही ओपनरनी भारताला 117 रनची सुरूवात करून दिली, पण मयंक 60 रनवर आऊट झाला. यानंतर लगेचच पुढच्याच बॉलला चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) शून्य रनवर माघारी परतला. लागोपाठ दोन विकेट गेल्यानंतर राहुल आणि विराटने भारताचा डाव सावरायला सुरुवात केली. पण ऑफ स्टम्पच्या बाहेरचा बॉल मारण्याच्या नादात विराट 35 रनवर आऊट झाला. विराटची विकेट गेल्यानंतर राहुलने पुन्हा एकदा अजिंक्य रहाणेसोबत पार्टनरशीप केली. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने (Lungi Ngidi) सगळ्या 3 विकेट घेतल्या.
भारताला अजूनही दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. या दौऱ्याच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे, त्यामुळे दुसऱ्या दिवशी हा स्कोअर आणखी पुढे घेऊन विजयी स्थितीमध्ये पोहोचण्याचा टीमचा प्रयत्न असेल.