धावांचा पाऊस पाडूनही टीम इंडियातून बाहेर बसवलं, संधी मिळताच केला 'डबल धमाका'

धावांचा पाऊस पाडूनही टीम इंडियातून बाहेर बसवलं, संधी मिळताच केला 'डबल धमाका'

भारताचा फलंदाज मयंक अग्रवालने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात द्विशतकी खेळी केली. यासह त्याने वीरेंद्र सेहवागच्या कामगिरीशी बरोबरी केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 ऑक्टोंबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर मयंक अग्रवालने द्विशतकी खेळी केली आहे. त्याने या खेळीसह भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या कामगिरीशी बरोबरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतक करणारा सेहवागनंतर तो भारताचा दुसराच फलंदाज ठरला आहे. त्याने पहिल्या गड्यासाठी 317 धावांची विक्रमी भागिदारी केली. आज त्याच्या खेळीचं कौतुक होत असलं तरी सुरुवातीला त्याला संघर्षाला सामोरं जावं लागलं होतं.

मयंक अग्रवालने 2017-18 मध्ये रणजी ट्रॉफीत सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीतही सर्वाधिक धावा केल्या. इतकंच नाही तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉपीदेखील गाजवली. त्यानंतर इंडिया ए संघाकडून खेळताना तीन शतक, एक द्विशतक साजरं केलं. याशिवाय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक केलं.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर त्याला दहा महिन्यानंतर त्याची निवड संघात झाली. त्यातही त्याला बाकावर बसावं लागलं होतं. तुलनेनं कमकुवत अशा संघाविरुद्धही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नव्हतं.

क्रिकेट कारकिर्दीत 2017 मध्ये मयंकने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत 28.66 च्या सरासरीने 258 धावा केल्या. त्यानंतर रणजीमध्ये 1160 धावांचा पाऊस पाडला. यात त्याने पाच शतकंही झळकावली होती. एवढंच नाही तर पुढे विजय हजारे ट्रॉफीत 90.37 च्या सरासरीने 723 धावा केल्या होत्या.

वर्ल्ड कपदरम्यान विजय शंकर दुखापतीने बाहेर पडला होता. त्यावेळी मयंक अग्रवालला संधी देण्यात आली होती. तेव्हा मयंकच्या निवडीवरून अनेक दिग्गजांनी प्रश्न उपस्थित केले होते. मयंक अग्रवालला तेव्हाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नव्हतं.

मयंकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गेल्या वर्षी कसोटीतून पदार्पण केलं होतं. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 65 च्या सरासरीने 195 धावा केल्या होत्या. इंग्लंडमध्ये मयंक तिरंगी मालिकेत इंडिया ए कडून खेळताना सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याने 4 सामन्यात 287 धावा केल्या होत्या. त्यानंतर विंडीजविरुद्ध दोन कसोटीत त्याने एका अर्धशतकासह 80 धावा केल्या होत्या.

कर्नाटकचा असलेल्या मयंकने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीपूर्वी चार सामने खेळले आहेत. यात त्याने 39.28 च्या सरासरीने 275 धावा केल्या होत्या. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 54 सामन्यात 47.89 च्या सरासरीने 4 हजार 167 धावा केल्या आहेत. यामध्ये नाबाद 304 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यात 8 शतकं आणि 25 अर्धशतकं केली आहेत.

वर्ल्ड कपपूर्वी आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून 13 सामन्यात त्यानं 142 च्या स्ट्राइक रेटनं 332 धावा केल्या आहेत. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली तर त्याला पुन्हा सलामीला खेळवलं जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास केएल राहुल चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो.

VIDEO: 'राज्यातून जातीयवादी पक्षांची सत्ता हद्दपार करणार', पृथ्वीराज चव्हाणांचा निर्धार

Published by: Suraj Yadav
First published: October 3, 2019, 2:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading