लखनऊ, 29 जानेवारी : भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 सामन्यात निसटता विजय मिळवला. फक्त 100 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला विजयासाठी अखेरच्या षटकापर्यंत झगडावे लागले. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने एक विकेट घेतली. त्याने फिन एलनला बाद केलं. या विकेटसह युझवेंद्र चहलने भारताकडून टी20 सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्याची कामगिरी केली. युझवेंद्र चहलने वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला मागे टाकलं. भुवनेश्वर कुमारने भारताकडून टी20 सामने खेळताना 90 विकेट घेतल्या आहेत. तर आता चहलच्या नावावर 91 विकेट जमा झाल्या आहेत.
लखनऊत झालेल्या सामन्यात युझवेंद्र चहलला वेगवान गोलंदाज उमरान मलिकच्या जागी संघात स्थान मिळालं होतं. चहलने कर्णधार हार्दिक पांड्याचा निर्णय सार्थ ठरवत त्याच्या पहिल्याच षटकात न्यूझीलंडचा सलामीवीर फिन एलनला बाद करून भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यासह तो टी20 क्रिकेटमध्ये 91 विकेट घेणारा भारताचा पहिला गोलंदाज ठरला.
हेही वाचा : IND Vs NZ: टी20 की कसोटी? सामन्यात झालेले विक्रम पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न
युझवेंद्र चहलने वेगवान गोलंदाज भुवनेश्वरचा विक्रम मोडला. भुवनेश्वरच्या नावावर टी20 क्रिकेटमध्ये 90 विकेट आहेत. चहलने 91 विकेट घेण्याची कामगिरी 75 सामन्यात केली. तर आर अश्विन या यादीत तिसऱ्या स्थानी असून त्याने 72 विकेट घेतल्या आहेत. चौथ्या स्थानावर भारताचा वेगवान गोलंदाज बुमराह असून त्याने 70 विकेट घेतल्या आहेत. तर पाचव्या क्रमांकावर असलेल्या हार्दिक पांड्याच्या नावावर 64 विकेट आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Yuzvendra Chahal