कानपूर, 28 नोव्हेंबर : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) विश्रांती देण्यात आली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या (India vs New Zealand) तीन टी-20 आणि पहिल्या टेस्टमध्ये विराट खेळला नाही, यानंतर आता मुंबईमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये विराट पुनरागमन करणार आहे. 3 डिसेंबरपासून वानखेडे स्टेडियमवर हा सामना सुरू होणार आहे, पण विराटच्या पुनरागमनानंतर कोणत्या खेळाडूला डच्चू द्यायचा, हा प्रश्न भारतीय टीम प्रशासनापुढे असणार आहे. टीम इंडियाचे बॅटिंग कोच विक्रम राठोड (Vikram Rathour) यांनी याचं उत्तर दिलं आहे.
कोहली परत आल्यानंतर टीममधून कोणाला काढणार? असं विचारल्यानंतर विक्रम राठोड यांना स्पष्ट उत्तर देता आलं नाही. 'कर्णधार पुनरागमन करतोय, पुढची टेस्ट मुंबईमध्ये होणार आहे, त्यामुळे आम्ही जेव्हा मुंबईत जाऊ तेव्हा यावर निर्णय घेऊ. सध्या आमचं लक्ष या मॅचवर आहे. अजून एक दिवसाचा खेळ शिल्लक आहे आणि मॅच जिंकणं महत्त्वाचं आहे. मुंबईत पोहोचू तेव्हा यावर चर्चा करू,' असं विक्रम राठोड म्हणाले.
चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सध्या खराब फॉर्ममधून जात आहेत. त्यातच श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) आपल्या पदार्पणाच्या टेस्टमध्येच 105 आणि 65 रनची खेळी केली, त्यामुळे त्याला टीमबाहेर करता येणार नाही. विक्रम राठोड यांना पुजारा आणि रहाणेच्या फॉर्मविषयचीही विचारण्यात आलं.
'तुम्ही टॉप ऑर्डरकडून योगदानाची अपेक्षा करता, पण रहाणेने 79 आणि पुजाराने 91 टेस्ट खेळल्या आहेत,' अशी प्रतिक्रिया विक्रम राठोड यांनी दिली. 2021 मध्ये रहाणेची सरासरी 19.57 तर पुजाराची सरासरी 30.42 एवढी कमी आहे. विक्रम राठोड यांनी या दोघांच्या कामगिरीचा बचाव केला. भारतासाठी ते एवढ्या मॅच खेळले, म्हणजे त्यांनी चांगलीच कामगिरी केली असेल, असं वक्तव्य राठोड यांनी केलं.
'रहाणे आणि पुजारा खराब फॉर्ममधून जात आहेत, पण भूतकाळात त्यांनी टीमसाठी चांगल्या खेळी केल्या आहेत. ते पुनरागमन करतील आणि टीमसाठी महत्त्वाच्या खेळी करतील, याचा आम्हाला विश्वास आहे. एका खेळाडूला फॉर्ममध्ये येण्यासाठी किती टेस्ट लागतील, हे निश्चित सांगता येत नाही. या गोष्टी परिस्थितीवर आणि टीमला काय गरजेचं आहे, यावर अवलंबून आहे,' असं राठोड म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Team india, Virat kohli