लखनऊ, 30 जानेवारी : न्यूझीलंडने फक्त ९९ धावांचं आव्हान दिलेलं असतानाही टीम इंडियाला ते पूर्ण करण्यासाठी अखेरच्या षटकापर्यंत धडपड करावी लागली. दबावाखाली खेळताना भारतीय फलंदाजांकडून काही चुकाही झाल्या. यातच इशान किशन धावबाद झाला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरदेखील धावबाद झाला. वॉशिंग्टनने सूर्यकुमार यादव बाद होऊ नये म्हणून स्वत:ला धावबाद करून घेतलं. पण यानंतर उलट सूर्यकुमार यादवच वॉशिंग्टनवर भडकल्याचं चित्र मैदानात दिसलं.
भारताने न्यूझीलंडला ९९ धावात रोखले. न्यूझीलंडकडून कर्णधार मिशेल सँटनरने सर्वाधिक नाबाद १९ धावा केल्या. तर मार्क चॅपमन आणि मायकल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी १४ धावांची खेळी केली. तर भारताकडून अर्शदीप सिंगने २ तर दीपक हुड्डा, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
हेही वाचा : IND Vs NZ: टी20 की कसोटी? सामन्यात झालेले विक्रम पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न
दरम्यान, भारताचा सलामीवीर शुभमन गिल ११ धावांवर बाद झाल्यानतंर इशान किशन आणि राहुल त्रिपाठी यांनी डाव सावरला. मात्र २८ धावांची भागिदारी झाल्यानतंर इशान किशन धावबाद झाला. इशान दुसरी धाव घेण्यासाठी पुढे आला पण राहुल त्रिपाठीने त्याला मागे जाण्यास सांगितलं. या गोंधळात ग्लेन फिलिप्सने केलेल्या थेट थ्रोवर इशान बाद झाला. यानंतर राहुल त्रिपाठी झेल बाद झाला.
वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीला आल्यानतंर सूर्यकुमारसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण समन्वयाच्या अभावामुळे वॉशिंग्टन १० धावांवर धावबाद झाला. इश सोधीच्या चेंडूवर सूर्यकुमारने रिव्हर्स स्वीप मारला. तेव्हा पायचितचे अपील करण्यात आले. दरम्यान, सूर्यकुमार धाव घेण्यासाठी पळाला पण नॉन स्ट्रायकर एंडला असणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने त्याला नकार दिला. मात्र सूर्यकुमार तरीही धावत गेल्यानं अखेर वॉशिंगटन सुंदर धावबाद झाला.
वॉशिंग्टन सुंदर बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी संयमी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. दोघांनी ३१ धावांची नाबाद भागिदारी केली. सूर्यकुमार यादव २४ धावांवर नाबाद राहिला. त्याने अखेरच्या षटकात ३ चेंडूत ३ धावा हव्या असताना चौकार मारत विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket