कानपूर, 23 नोव्हेंबर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 2 टेस्ट मॅचच्या सीरिजला (India vs New Zealand Test Series) 25 नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. सीरिजची पहिली टेस्ट कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये खेळवली जाईल, पण मॅचच्या आधीच पिचबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही टीमनी प्रॅक्टिस पिचबाबत तक्रार केली आहे. दोन्ही टीमना खेळाडूंना दुखापत होईल, याची भीती होती, यानंतर पिचमध्ये बदल करण्यात आला. कानपूरमध्ये 5 वर्षांनंतर टेस्ट होणार आहे.
दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) सोमवारी संध्याकाळी पिच पाहण्यासाठी गेले होते, पण पिच पाहून दोघंही नाराज झाले. यानंतर त्यांनी न्युट्रल पिच क्युरेटर एल प्रशांत राव यांच्यासोबत चर्चा केली आणि पिचमध्ये सुधारणा करण्याची विनंती केली. यानंतर न्यूझीलंडचे कोच गॅरी स्टेड यांनीही पिचच्या बाऊन्सबाबत तक्रार केली. मैदानाचे क्युरेटर शिवकुमार आणि बीसीसीआयचे न्युट्रल क्युरेटर एल प्रशांत राव यांनी नंतर पिचमध्ये सुधारणा करायला सुरुवात केली. यानंतर न्यूझीलंडच्या टीमने मंगळवारी सकाळी सराव केला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आधी 3 टी-20 मॅचची सीरिज झाली होती. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारताने न्यूझीलंडचा 3-0 ने पराभव केला होता. टेस्ट सीरिजसाठी रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. विराट कोहलीही (Virat Kohli) पहिली टेस्ट खेळणार नाही, तर केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. पहिल्या टेस्टमध्ये अजिंक्य रहाणेकडे टीमचं नेतृत्व असेल. दुसऱ्या टेस्टमध्ये पुनरागमन केल्यानंतर विराट पुन्हा कॅप्टन असेल. दुसरी टेस्ट 3 डिसेंबरपासून मुंबईमध्ये सुरू होणार आहे.
न्यूझीलंडचं भारतातलं रेकॉर्ड खराब आहे. दोन्ही टीममध्ये भारतात आतापर्यंत 11 टेस्ट सीरिज झाल्या, यातल्या 9 सीरिज भारताने जिंकल्या तर 2 सीरिज बरोबरीत सुटल्या. केन विलियमसनने टेस्ट सीरिजच्या तयारीसाठी टी-20 सीरिजमधून नाव मागे घेतलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: New zealand, Team india