लखनऊ, 30 जानेवारी : भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकात विजय मिळवला. न्यूझीलंडच्या संघाला ९९ धावात रोखल्यानतंरही भारताला विजयासाठी अखेरच्या षटकापर्यंत झगडावे लागले. फिरकी गोलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर दोन्ही संघांचे फलंदाज एक एक धाव करण्यासाठी धडपडत होते. दोन्ही संघांकडून एकाही फलंदाजाला षटकार मारता आला नाही. भारताने ६ विकेटने सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरीसुद्धा केली.
न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरला बढती देत वरच्या क्रमांकावर खेळण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. मात्र सूर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन यांच्यातला ताळमेळ चुकल्यानं वॉशिंग्टनला धावबाद व्हावं लागलं होतं. या सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादवला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. सामन्यानंतर बोलताना वॉशिंग्टन सुंदर धावबाद झाला त्यावरही सूर्यकुमारने भाष्य केलं.
हेही वाचा : IND Vs NZ : सूर्यकुमारसाठी वॉशिंग्टन धावबाद झाला, पण त्याच्यावर सूर्या संतापला; VIDEO
सूर्यकुमार यादव म्हणाला की, आज माझं वेगळं रूप दिसलं. मी ज्या परिस्थितीमध्ये फलंदाजी करायला मैदानात उतरलो तेव्हाच्या परिस्थितीला जुळवून घेत खेळण्याची गरज होती. फलंदाजांसाठी ही खेळपट्टी सोपी नव्हती आणि वॉशिंग्टन बाद झाल्यावर मैदानात टिकून राहणं महत्त्वाचं होतं.
सूर्यकुमारने फटका मारल्यानंतर तो धाव घेण्यासाठी पळाला होता. पण वॉशिंग्टन सुंदरने धाव न घेण्याचा इशारा दिला. तरीही सूर्यकुमार नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने धावत आला आणि शेवटी सूर्यकुमार बाद होऊ नये यासाठी वॉशिंग्टन सुंदरने आपली विकेट फेकली होती. यावर सूर्यकुमारने आपली चूक मान्य करताना, वॉशिंग्टन ज्या प्रकारे धावबाद झाला त्यात माझीच चूक होती असं म्हटलं. तो बाद झाल्यानंतर अखेरच्या षटकापर्यंत सामना गेला तेव्हा जिंकण्यासाठी एका चांगल्या शॉटची गरज असल्याची जाणीव आम्हाला होती. हार्दिकने मला पुढच्या चेंडूवर तू विजयी धाव घेणार आहेस असं सांगितल्यानं आत्मविश्वास वाढला आणि चौकार मारल्याचही सूर्यकुमारने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket