मुंबई, 24 जानेवारी : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंड समोर विजयासाठी 386 धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली असून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतक ठोकले.
आज 24 जानेवारी रोजी न्यूझीलंड विरुद्ध मालिकेतील तिसरा सामना इंदोर येथील होलकर स्टेडियमवर खेळवला जात आहे. सामन्याच्या सुरुवातीला न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भेदक गोलंदाजी करून भारतीय फलंदाजांना लवकरात लवकर बाद करण्याचा सापळा न्यूझीलंडने रचला होता. परंतु भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या या योजनेला हाणून पाडले.
हे ही वाचा : रोहितचा दुष्काळ संपला, गिलचा वर्षाव सुरूच; टीम इंडियाचा डबल धमाका!
सामन्याच्या सुरुवातीला सलामी फलंदाज म्हणून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानात उतरले. रोहित शर्मा 85 चेंडूत 101 धावा करून बाद झाला. तर शुभमन गिल 78 चेंडूत 112 धावा करून बाद झाला. या दोघांनी 200 हुन अधिक धावांची भागीदारी रचली. रोहितने वनडे सामन्यातील त्याचे 30 वे शतक ठोकले तर शुभमनचे वनडे मधील हे चौथे शतक ठरले.
रोहित बाद झाल्यानंतर मैदानात आलेला विराट कोहली 27 चेंडूत 37 धावा करून माघारी परतला. हार्दिक पांड्याने 38 चेंडूत 54 धावा करून अर्धशतक ठोकले. परंतु त्यानंतर सूर्यकुमार, ईशान किशन, शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर इत्यादी कोणीही समाधानकारक कामगिरी करू शकले नाही. अखेर 9 विकेट्स घालून भारतीय संघाने 385 धावा केल्या.
हे ही वाचा : मोहम्मद शमीला न्यायालयाचा दणका! विभक्त पत्नीला दरमहा द्यावे लागणार लाखो रुपये
न्यूझीलंड समोर भारताने सामना जिंकण्यासाठी 386 धावांचे तगडे आव्हान ठेवले आहे. भारताने दिलेलं हे आव्हान पूर्ण करणं न्यूझीलंड संघासाठी नक्कीच सोप्प नसेल. यापूर्वी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवलेला पहिला सामना भारताने 12 धावांनी जिंकला होता. तर रायपूर येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यातही भारताने न्यूझीलंडला गुडघे टेकायला भाग पाडले आणि 8 विकेट्सने सामना जिंकला. त्यामुळे दोन सामने जिंकून भारताने ही मालिका खिशात घातलेलीच आहे. परंतु या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी परतवून न्यूझीलंडला व्हाईट वॉश देण्याचा मनसुबा भारतीय संघाचा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Rohit sharma, Shubhman Gill, Team india