मुंबई, 3 डिसेंबर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला (India vs New Zealand 2nd Test) मुंबईमध्ये सुरुवात झाली आहे. या सामन्यातून विश्रांतीनंतर कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohli) कमबॅक केलं आहे. विराटच्या कमबॅकनंतर विराटने टीममध्ये तीन बदल केले. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि इशांत शर्मा (Ishant Sharma) यांना या तिघांना दुखापत झाल्यामुळे ते या टेस्टसाठी मैदानात उतरले नाहीत. त्यांच्याऐवजी विराट, जयंत यादव (Jayant Yadav) आणि मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) यांना संधी देण्यात आली आहे. अजिंक्य रहाणे हा गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे त्याच्या टीममधल्या स्थानावर आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं.
न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कानपूर टेस्टमध्ये अजिंक्य रहाणे टीम इंडियाचा कर्णधार होता. पण मुंबईकर असूनही रहाणेला त्याच्या घरच्या मैदानात सुरू असलेल्या टेस्ट मॅचसाठी टीम इंडियात संधी मिळाली नाही. या सामन्यात एक मुंबईकर खेळत नसला तरी दुसऱ्या मुंबईकराने टीम इंडियाचाच घात केला आहे. मुंबईमध्ये जन्मलेल्या एजाझ पटेलने (Ajaz Patel) भारताचे सुरुवातीचे 4 खेळाडू आऊट केले.
मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल या ओपनरनी टीम इंडियाला 80 रनची पार्टनरशीप करून दिली, पण एजाझ पटेलने भारताच्या लागोपाठ तीन विकेट घेतल्या. शुभमन गिलला त्याने रॉस टेलरकरवी कॅच आऊट केलं, यानंतर त्याने चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) शून्य रनवर बोल्ड केलं, तर विराट कोहलीही शून्य रनवर एजाझच्याच बॉलिंगवर एलबीडब्ल्यू झाला. मागच्या सामन्यात शतक आणि अर्धशतक करणाऱ्या श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) एजाझने 18 रनवर आऊट केलं. टॉम ब्लंडेलने अय्यरचा कॅच पकडला.
मुंबईमध्ये 21 ऑक्टोबर 1988 रोजी जन्मलेला पटेल वयाच्या आठव्या वर्षांपर्यंत भारतामध्येच होता. पण नंतर कुटुंबासोबत न्यूझीलंडला स्थायीक झाला. सुरुवातीला तो डावखुरा फास्ट बॉलर होता, पण काही काळानंतर त्याने स्पिन बॉलिंग करायला सुरुवात केली.
एजाझ पटेलने 2018 साली टेस्टमध्ये पदार्पण केलं होतं, पाकिस्तानविरुद्धच्या त्या सामन्यात एजाजने 7 विकेट घेतल्या आणि न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. एजाझ पटेल आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये मॅन ऑफ द मॅच होता. एजाझ पटेलने आतापर्यंत 11 टेस्टमध्ये 30.51 च्या सरासरीने 33 विकेट घेतल्या आहेत. याआधी कानपूरमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्येही एजाझ पटेलने टीम इंडियाच्या हातचा विजयाचा घास हिरावून घेतला. कानपूर टेस्टमध्ये टीम इंडियाला विजयासाठी एका विकेटची गरज होती, पण एजाझ पटेलने रचीन रविंद्रच्या मदतीने अखेरच्या विकेटसाठी 52 बॉल किल्ला लढवला आणि न्यूझीलंडला मॅच ड्रॉ करण्यात यश आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Team india