हेडिंग्ले, 26 ऑगस्ट : भारताविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचे (India vs England) खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले. इंग्लंडचे माजी कर्णधार टेड डेक्सटर (Ted Dexter) यांचं 86 व्या वर्षी निधन झालं, त्यांना श्रद्धांजली म्हणून इंग्लंडच्या खेळाडूंनी हाताला काळी पट्टी बांधली होती. मेरिलबोन क्रिकेट क्लबने (MCC) याबाबत गुरुवारी माहिती दिली. आजारी असलेल्या टेड यांचं बुधवारी दुपारी वोल्वरहॅम्पटनच्या कॉम्पटन होसपाईसमध्ये निधन झालं.
मधल्या फळीतील बॅट्समन आणि मध्यमगती बॉलर असलेल्या टेड यांनी 1958 ते 1968 मध्ये 62 टेस्ट खेळल्या, यापैकी 30 मॅचमध्ये ते कर्णधार होते. त्यांनी 47.89 च्या सरासरीने 4,502 रन केले आणि 66 विकेट घेतल्या. टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 9 शतकं केली, यातल्या 6 इनिंग 140 पेक्षा जास्त स्कोअरच्या होत्या.

याच वर्षी टेड डेक्सटर यांना आयसीसीने क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये स्थान दिलं होतं. ते एमसीसीचे अध्यक्षही होते. निवृत्तीनंतर टेड यांनी पत्रकार आणि प्रसारणकर्त्याचं कामही केलं. तसंच ते इंग्लंडच्या निवड समितीचे अध्यक्षही होते. खेळाडूंची रॅकिंग प्रणाली तयार करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. आता याला एमआरएफ टायर्स आयसीसी रँकिग नावाने ओळखलं जातं.

डेक्सटर यांनी 1956 ते 1968 पर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 21 हजारांपेक्षा जास्त रन केल्या आणि 419 विकेट मिळवल्या. आयसीसी आणि एमसीसीनेही डेक्सटर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.