लंडन, 6 जुलै : टीम इंडियाचे (Team India) खेळाडू सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहेत, पण तिकडे गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. इंग्लंड टीममधल्या (England Cricket) 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, यात 3 खेळाडू आणि 4 सपोर्ट स्टाफचा समावेश आहे. टीममध्य कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे आता पाकिस्तानविरुद्धच्या सीरिजसाठी इंग्लंडने (England vs Pakistan) त्यांची संपूर्ण टीमच बदलली आहे.
एकीकडे इंग्लंडमध्ये कोरोना रुग्ण वाढत असतानाच भारतीय खेळाडू इंग्लंडमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल संपल्यानंतर खेळाडूंना 20 दिवसांचा ब्रेक मिळाला आणि ते बायो-बबलच्या बाहेर आले. इंग्लंडमधलं कोरोनाचं संकट बघता बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंना कोरोना लसीचा दुसरा डोस द्यायची तयारी सुरू केली आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार टीम इंडियाच्या खेळाडूंना बुधवार आणि शुक्रवारी कोरोना लसीचा (Corona Vaccine) दुसरा डोस दिला जाईल. बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली. इंग्लंडला रवाना होण्याआधीच टीम इंडियाच्या बहुतेक खेळाडूंनी भारतात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. इंग्लंडमध्ये दुसरा डोस घ्यायचा असल्यामुळे बीसीसीआयने खेळाडूंना भारतात कोव्हिशिल्डचा पहिला डोस घ्यायला सांगितला होता.
भारतीय खेळाडू 14 जुलैला लंडनमध्ये एकत्र येणार आहेत, त्याआधी त्यांची पुन्हा एकदा कोरोना टेस्ट होणार आहे. या टेस्टचा निकाल आल्यानंतर खेळाडू बायो-बबलमध्ये प्रवेश करतील. यानंतर दोन आठवडे सराव सत्र आणि एक सराव सामना होणार आहे. भारत-इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे, तर 14 सप्टेंबरला सीरिज संपणार आहे. इंग्लंडवरून टीम इंडिया आयपीएल (IPL 2021) खेळण्यासाठी युएईला रवाना होईल. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएल झाल्यानंतर लगेच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात युएईमध्येच टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus, India vs england, Team india