लंडन, 6 जुलै: टीम इंडियाचे (Team India) खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर (WTC Final) 20 दिवसांच्या विश्रांतीवर आहे. पण इंग्लंडच्या तीन खेळाडूंना आणि 4 सपोर्ट स्टाफना कोरोनाची (Corona Virus) लागण झाल्यामुळे आता टीम इंडियाच्या खेळाडूंना बाहेर पडण्यावर बंदी घातली जाऊ शकते. बीसीसीआयने (BCCI) याबाबत अजून कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातली 5 टेस्ट मॅचची सीरिज 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्याआधी टीम इंडिया 19 ऑगस्टपासून सराव सामना खेळणार आहे.
ब्रिटनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मागच्या काही दिवसांमध्ये तिकडे प्रत्येक दिवशी 27 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. इंग्लंडलमधल्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असं बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमळ यांनी आधीच सांगितलं आहे. इंग्लंड टीममधले एकूण 7 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना पाकिस्तानविरुद्धच्या सीरिजसाठी (England vs Pakistan) टीम बदलावी लागणार आहे. 8 जुलैपासून या वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे.
इंग्लंडमधल्या वाढत्या कोरोना रुग्णांमुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना अधिक सावध राहण्याची गरज आहे. इंग्लंडविरुद्धची सीरिज टेस्ट 14 सप्टेंबरला संपणार आहे. यानंतर खेळाडू युएईला आयपीएल (IPL 2021) खेळण्यासाठी जातील. यानंतर लगेचच टी-20 वर्ल्ड कपही (T20 World Cup) होणार आहे, त्यामुळे पुढचे 4 महिने टीम इंडियासाठी व्यग्र असणार आहेत. कोरोना रुग्ण आढळल्यामुळे यंदाची आयपीएल 4 मे रोजी 29 सामन्यांनंतर स्थगित करण्यात आली होती. आता उरलेले 31 सामने युएईमध्ये होणार आहेत.
भारत-इंग्लंड सीरिजचं वेळापत्रक
पहिली टेस्ट : ट्रेन्ट ब्रिज, 4 ऑगस्टपासून
दुसरी टेस्ट : लॉर्ड्स, 12 ऑगस्टपासून
तिसरी टेस्ट : हेडिंग्ले, 25 ऑगस्टपासून
चौथी टेस्ट : द ओवल, 2 सप्टेंबरपासून
पाचवाी टेस्ट : ओल्ड ट्रॅफर्ड, 10 सप्टेंबरपासून
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Cricket, India vs england, Team india