मुंबई, 6 जुलै : भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या (India vs England T20 Series) 3 टी-20 मॅचच्या सीरिजला गुरूवारपासून सुरूवात होत आहे. सीरिजचा पहिला सामना साऊथम्पटनच्या रोज बाऊलमध्ये होणार आहे. मंगळवारी एजबॅस्टनमध्ये झालेल्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा दारूण पराभव झाला होता, या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल.
बर्मिंघममध्ये झालेल्या या सामन्यात टीम इंडियाचा 7 विकेटने पराभव झाला होता. याचसोबत दोन्ही देशांमधली 5 टेस्ट मॅचची सीरिज 2-2 ने बरोबरीत सुटली. या सीरिजच्या पहिल्या 4 टेस्ट मागच्या वर्षी झाल्या होत्या, पण टीम इंडियामध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे पाचवी टेस्ट पुढे ढकलण्यात आली होती. ही टेस्ट आता खेळवण्यात आली.
कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) टेस्ट मॅच खेळू शकला नव्हता, पण आता रोहितची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे, त्यामुळे तो पहिल्या टी-20 मध्ये खेळण्याची शक्यता आहे. रोहित फिट असेल तर त्याच्याच नेतृत्वात टीम इंडिया खेळेल. विराट कोहलीला मात्र पहिल्या टी-20 साठी आराम देण्यात आला आहे.
ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांच्यापैकी एक जण रोहितसोबत ओपनिंगला येईल, तर संजू सॅमसनही टी-20 टीमचा भाग आहे, याशिवाय दिनेश कार्तिक विकेट कीपिंगची जबाबदारी सांभाळेल. ऋषभ पंत टेस्ट मॅचमध्ये होता, त्यामुळे त्याला आराम दिला जाऊ शकतो. उमरान मलिक, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि हर्षल पटेल या फास्ट बॉलरचा पर्यायही रोहितपुढे उपलब्ध आहे.
पहिल्या टी-20 साठी भारतीय टीम
रोहित शर्मा, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, T20 cricket