नॉटिंघम, 3 ऑगस्ट : टीम इंडियामध्ये (Team India) सगळं काही आलबेल आहे का नाही? हा प्रश्न उपस्थित व्हायचं कारण म्हणजे भारताचे महान खेळाडू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी केलेले खळबळजनक आरोप. टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) डच्चू मिळणार असल्याचे संकेत सुनिल गावसकरांनी दिले. टीममध्ये रहाणेविरुद्ध अभियान चालवलं जात आहे. चेतेश्वर पुजाराचं (Cheteshwar Pujara) नाव यामध्ये ओढलं जात आहे, कारण निशाणा अजिंक्य रहाणे आहे हे दिसू नये, असं गावसकर एका मुलाखतीमध्ये म्हणाले आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना गावसकर म्हणाले, 'इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये रहाणे आणि पुजारावर दबाव असेल, कारण टीममधली यांची जागा धोक्यात आहे. या दोघांसोबत हे अनुचित आहे, कारण अनेक वर्ष ते भारतीय क्रिकेटची सेवा करत आहेत. टीमच्या चांगल्या कामगिरीसाठी त्यांनी जीवाचं रान केलं. मागच्या 6 महिन्यात त्यांची कामगिरी शानदार झाली. रहाणे आणि पुजाराला टीममधून बाहेर करण्यासाठी मोहीम चालवली जात आहे, हे चुकीचं आहे.'
'मागच्या 6-8 महिन्यात कोणी रन केले आहेत, हे मला सांगा. पुजारा फक्त मोहरा आहे, असली शिकार रहाणे आहे. पुजाराचं नाव या वादामध्ये आणलं जात आहे, कारण जगाला असं वाटू नये की रहाणेवर निशाणा साधला जात आहे. पुजाराचं नाव घेतलं जात आहे, पण खरं टार्गेट अजिंक्य रहाणेच आहे. रहाणेला गुंतवणूक म्हणून बघा, त्याला धोका समजू नका. पण उलट होत आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे, हे तुम्हाला कळत आहे,' असं विधान गावसकरांनी केलं. इशाऱ्या इशाऱ्यांमध्ये त्यांनी टीमच्या दिग्गज खेळाडूंवर प्रश्न उपस्थित केले.
'अजिंक्यने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या 36 रनवर ऑल आऊट झाल्यानंतर शतक केलं. ब्रिस्बेन टेस्टमधल्या ऐतिहासिक विजयातही आव्हानाचा पाठलाग करताना रहाणेने महत्त्वाची भूमिका निभावली होती. इंग्लंडविरुद्ध स्पिन होणाऱ्या खेळपट्टीवर रहाणेने अर्धशतक केलं. फायनलमध्येही तो भारताचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. तरीही रहाणे आणि पुजारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामागे काय हेतू आहे, ते पाहिलं पाहिजे,' अशी प्रतिक्रिया गावसकरांनी दिली.
न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. यानंतर विराट कोहलीने टीमच्या बॅट्समनविषयी प्रश्न उपस्थित केले होते. विराटने अप्रत्यक्षपणे पुजारा आणि रहाणेवर निशाणा साधला होता. विराटने टीममध्ये पूर्णपणे बदलाचे संकेत दिले होते. 'आम्हाला पुनर्म्यूल्यांकन करावं लागेल आणि पुन्हा योजना बनवावी लागेल. निडर होऊन खेळण्याची गरज आहे. योग्य व्यक्तींना टीममध्ये आणावं लागेल, ज्यांच्याकडे कामगिरी करण्याची योग्य मानसिकता आहे,' असं विराट म्हणाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajinkya rahane, India vs england, Pujara, Sunil gavaskar