Home /News /sport /

IND vs ENG: कॉमेंट्रीदरम्यान संतापले सुनिल गावस्कर, इंग्लंडच्या माजी कर्णधाराला सुनावलं अन् त्याची बोलती केली बंद

IND vs ENG: कॉमेंट्रीदरम्यान संतापले सुनिल गावस्कर, इंग्लंडच्या माजी कर्णधाराला सुनावलं अन् त्याची बोलती केली बंद

भारताचे माजी कॅप्टन सुनील गावस्कर आणि इंग्लंडचा माजी कॅप्टन नासीर हुसेन यांच्यात शाब्दिक चकमक झाली. गावस्करांनी ऑन-एअर झापल्यानंतर हुसेनने सारवासारव करत उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण...

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट: भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडविरुद्ध टेस्ट मॅच खेळत आहे. या मॅचच्या सोनी टीव्हीवर सुरू असलेल्या लाइव्ह प्रक्षेपणात सुरू असलेल्या कॉमेंट्रीदरम्यान बुधवारी (25 ऑगस्ट 2021) भारताचे माजी कॅप्टन सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) आणि इंग्लंडचा माजी कॅप्टन नासीर हुसेन (Nasser Hussain) यांच्यात शाब्दिक चकमक झाली. याला कारणीभूत होता तो नासीर हुसेन याने इंग्लंडमधील एका पेपरमध्ये लिहिलेला लेख आणि त्यात त्याने भारतीय टीमबद्दल व्यक्त केलेलं मत. त्याचं झालं असं इंग्लंड क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन नासीर हुसेन यानी स्थानिक पेपरमध्ये एका लेखात लिहिलं की या आधीच्या पिढ्यांतील भारतीय क्रिकेट टीमच्या तुलनेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सध्या खेळत असलेल्या भारतीय क्रिकेट टीमला ‘बुली करणं’ म्हणजे थोडक्यात धाकात ठेवणं अवघड आहे. त्याच्या या मताला सुनील गावस्कर यांनी मॅचच्या सुरू असलेल्या कॉमेंट्रीदरम्यानच आक्षेप घेतला. त्यांना हे मत पटलं नाही. त्यामुळे ही शाब्दिक चकमक झाली. गावस्कर यांनी हुसेनला विचारलं, ‘तुम्ही लेखात म्हटलंय की या भारतीय टीमला बुली करता येणं अशक्य आहे पण या आधीच्या पिढीतल्या भारतीय टीमना बुली करणं शक्य होतं. तुम्ही नक्की सांगू शकता का की भारतीय क्रिकेटची कुठल्या पिढीतील टीम बुली करण्यासारखी होती? आणि बुली करणं याचा अर्थही सांगू शकता का? ’ हे वाचा-IND VS ENG:लीड्स टेस्टमध्ये मोहम्मद सिराज ब्रिटिश प्रेक्षकांशी भिडला; LIVE VIDEO गावस्करांनी ऑन-एअर झापल्यानंतर हुसेनने सारवासारव करत उत्तर दिलं, ‘मला फक्त असं वाटतं की या आधीच्या भारतीय टीम आक्रमकपणाला नाही म्हणायच्या. पण कोहलीने दुप्पट आक्रमक टीम उभारली आहे. सौरव गांगुलीच्या टीममध्ये मी हा आक्रमकपणा पाहिला होता त्याला पुढे विराट कोहलीने नेलं आणि सुरू ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर विराट पितृत्व रजेमुळे संघाच्या बाहेर असतानाही तेव्हाचा कॅप्टन अजिंक्य रहाणेनीही ऑस्ट्रेलियाच्या टीमवर वर्चस्व राखलं होतं.’ गावस्करांनी हुसेनचं म्हणणं खोडून काढण्यासाठी काही डेटा सांगितला. ते म्हणाले, ‘पण तुम्ही म्हणालात की आधीच्या पिढीतल्या टीमला धमकावलं जाऊ शकत होतं. पण असं म्हटलं तर मी खूपच नाराज होईन. तुम्ही रेकॉर्ड बघा 1971 मध्ये मी पहिल्यांदा इंग्लंड दौऱ्यावर आलो होतो तेव्हा आम्ही जिंकलो होतो. 1974 ला आमच्या टीमचे अंतर्गत प्रॉब्लेम्स होते त्यामुळे आम्ही 0-3 ने हरलो. 1979 ला आमचा 0-1 ने पराभव झाला पण ओव्हलमध्ये झालेल्या मॅचमध्ये जर आम्ही 438 रन्सचं लक्ष्य साध्य केलं असतं तर ती मालिका 1-1 अशी होऊ शकली असती. ’ गावस्करांनी उल्लेख केलेल्या ओव्हल मैदानावरची मॅच ड्रॉ झाली तेव्हा भारतीय टीम 8 बाद 429 रन्सवर खेळत होती. हे वाचा-IND vs ENG : 78 रनवर ऑल आऊट, टीम इंडियाच्या लाजिरवाण्या कामगिरीचे 10 क्षण गावस्कर पुढे म्हणाले, ‘1982 मध्ये आम्ही 0-1 ने हरलो. 1986 मध्ये आम्ही इंग्लंडवर 2-0 ने विजय मिळवला जो आम्ही 3-0 असाही मिळवू शकलो असतो. हे रेकॉर्ड पाहिलं तर मला वाटत नाही की आमच्या पिढीला धमकावणं शक्य होतं. ’ ‘प्रत्येक विकेट पडल्यावर जोरजोरात आरडाओरडा करून जल्लोष न करताही आपल्या मनातील कठोर निश्चयाचं दर्शन घडवता येतं. आक्रमकता म्हणजे प्रतिस्पर्ध्याच्या तोंडावर त्याला उत्तर देणं असा अर्थ होत नाही,’ असंही गावस्कर म्हणाले. परदेशी विशेषत: ब्रिटिश आणि ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्रं आणि माध्यमं नेहमीच भारतीय टीमवर विनाकारण टीका करत असतात. अनेकदा त्याला आधार नसतो. पण गावस्कर यांनी हा मुद्दा कॉमेंट्रीदरम्यान खोडून काढल्यामुळे पुन्हा एकदा माजी खेळाडूंच्या कर्तृत्वाला उजाळा मिळाला हे नक्की.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Sunil gavaskar

पुढील बातम्या