Home /News /sport /

IND vs ENG : 'दोन वर्ल्ड कप' नंतर इंग्लंडच्या पावसाने पुन्हा टीम इंडियाची वाट लावली

IND vs ENG : 'दोन वर्ल्ड कप' नंतर इंग्लंडच्या पावसाने पुन्हा टीम इंडियाची वाट लावली

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या पहिल्या टेस्टच्या पाचव्या दिवशी पावसाने व्यत्यय आणला, त्यामुळे मॅच ड्रॉ झाली.

    नॉटिंघम, 8 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या पहिल्या टेस्टच्या पाचव्या दिवशी पावसाने व्यत्यय आणला, त्यामुळे मॅच ड्रॉ झाली. शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी 157 रनची गरज होती आणि हातात 9 विकेट होत्या, त्यामुळे या सामन्यात टीम इंडियाचा विजय होईल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती, पण पावसामुळे त्यांची निराशा झाली आहे. पावसामुळे टीम इंडियाच्या पदरी निराशा यायची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही इंग्लंडमध्ये झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पावसामुळे पराभव झाला. आयसीसी स्पर्धांचे हे दोन्ही नॉक आऊट सामने होते. 2019 वर्ल्ड कपचं (World Cup 2019) आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आलं होतं. भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये झालेल्या सेमी फायनलमध्येही पावसाने खेळ केला होता. 9 जुलैला सुरू झालेली ही मॅच 10 जुलैला संपली होती. पावसामुळे राखीव दिवशी खेळ झाला आणि भारताला 240 रनच्या आव्हानाचा पाठलाग करता आला नाही. यानंतर जून महिन्यात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्येही (WTC Final) जोरदार पाऊस झाला. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ झाला नाही, तर दुसऱ्या दिवशी फक्त 64.4 ओव्हर टाकल्या गेल्या. पहिल्या इनिंगमध्ये भारताचा 217 रनवर ऑल आऊट झाला, यानंतर किवी टीमचा डाव 249 रनवर संपुष्टात आला. दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाला फक्त 170 रन करता आले. पावसामुळे हा सामनाही राखीव दिवशी खेळवला गेला आणि न्यूझीलंडचा 8 विकेटने विजय झाला. वर्ल्ड कप सेमी फायनल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये भारताने खराब खेळ केला असला तरी पावसाने टीम इंडियापुढे अडचणी निर्माण केल्या. नॉटिंघम टेस्टमध्ये भारताला विजयासाठी एकूण 209 रनची गरज होती. इंग्लंडमध्ये टेस्टच्या चौथ्या इनिंगमध्ये टीम इंडियाला एकदाही 200 रनचा यशस्वी पाठलाग करता आलेला नव्हता, पण या सामन्यात टीम इंडियाला हा रेकॉर्ड पुसण्याची संधी होती.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, India vs england

    पुढील बातम्या