भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच अडकणार विवाहबंधनात, कोण आहे लाईफ पार्टनर?

भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच अडकणार विवाहबंधनात, कोण आहे लाईफ पार्टनर?

Jasprit Bumrah Marriage : आपल्या घातक यॉर्कर्सने जगभरातील दिग्गज फलंदाजांची विकेट घेणाऱ्या बुमराहची विकेट नेमकी कोणी घेतली, याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 मार्च : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा त्याच्या दमदार कामगिरीसाठी नेहमीच चर्चेत असतो. मात्र सध्या बुमराह एका वेगळ्याचा कारणासाठी चर्चेत आला आहे. कारण इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याआधी (IND vs ENG) त्याने अचानक बीसीसीआयकडे सुट्टी मागितली आहे. वैयक्तिक कारणांसाठी बुमराहने माघार घेतली असली तरी आता त्याच्या लग्नाच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत.

जसप्रीत बुमराह लवकरच विवाहबंधनात (Jasprit Bumrah Marriage) अडकणार असून त्या तयारीसाठीच त्याने कसोटी मालिकेतून माघार घेतल्याची माहिती BCCIमधील सूत्रांकडून देण्यात आली आहे. मात्र बुमराहच्या जीवनसाथीचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. याबाबत 'क्रिकट्रॅकर'नं वृत्त दिलं आहे.

'मी लग्न करत असल्याने त्या तयारीसाठी मला सुट्टी हवी आहे,' असं जसप्रीत बुमराहने बीसीसीआयला सांगितल्याचं कळतंय. त्यामुळे आपल्या घातक यॉर्कर्सने जगभरातील दिग्गज फलंदाजांची विकेट घेणाऱ्या बुमराहची विकेट नेमकी कोणी घेतली, याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

बॉलिवूड सेलेब्रेटींप्रमाणेच क्रिकेटर्सचा विवाहसोहळा हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. बुमराहच्या बाबतीतही हेच घडत आहे. मात्र अद्याप बुमराने अधिकृतपणे आपल्या लग्नाविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही.

हेही वाचा - IPL 2021 : धोनी या दिवशी मैदानात उतरणार, सराव सुरू करणार!

दरम्यान, चार टेस्टच्या या मालिकेत भारतीय टीम सध्या 2-1 नं आघाडीवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची (WTC) फायनल गाठण्यासाठी भारताला ही मॅच जिंकणं किंवा ड्रॉ करणं आवश्यक आहे. तसं झालं तर लॉर्ड्सवर होणाऱ्या फायनलमध्ये भारताचा सामना न्यूझीलंडशी होईल. भारतानं ही टेस्ट गमावल्यास ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये प्रवेश करेल. तिसऱ्या टेस्टमध्ये पराभूत झाल्यानं इंग्लंडचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: March 3, 2021, 7:41 AM IST

ताज्या बातम्या