नॉटिंघम, 6 ऑगस्ट : टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्माने (Rohit Sharma) इंग्लंडमधल्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये यशस्वी होण्यासाठी त्याच्या बॅटिंगमध्ये काही बदल केले. यामध्ये बॉलला शरिराच्या जवळ खेळणं आणि क्रिजचा वापर करणं याचा समावेश आहे. बॅटिंगच्या तंत्रामध्ये बदल केले तरी आपण मोठे शॉट खेळण्यापासून हटणार नाही, असं रोहित शर्माने सांगितलं. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये (India vs England) रोहित शर्मा आणि केएल राहुल (KL Rahul) या ओपनिंग जोडीने टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांमध्ये 97 रनची ओपनिंग पार्टनरशीप झाली.
लंचआधीच्या शेवटच्या ओव्हरमध्ये ओली रॉबिनसनने (Ollie Robinson) टाकलेल्या बाऊन्सरवर रोहित शर्मा हूक शॉट मारायला गेला, पण फाईन लेगवर उभ्या असलेल्या सॅम करनने (Sam Curran) त्याचा कॅच पकडला. 36 रन करून रोहित शर्मा आऊट झाला. रोहितची विकेट गेल्यानंतर भारताची बॅटिंग गडगडली आणि पुजारा, विराट आणि अजिंक्य स्वस्तात माघारी परतले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 125/4 एवढा झाला होता.
मॅचनंत झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने त्याच्या विकेटविषयी आणि तो शॉट मारण्याविषयी प्रतिक्रिया दिली. 'तुम्हाला काही गोष्टी बदलाव्या लागतात. मीही तेच केलं. जेव्हा बॉल स्विंग होत असतो, तेव्हा ओपनर म्हणून तुम्हाला बॅटिंगच्या वेगवेगळ्या पैलूंचा वापर करावा लागतो. या परिस्थितीमध्ये खेळणं सोपं नसतं, पण कठीण परिस्थितीमध्ये खेळण्यासाठी तुम्ही स्वत:ला आव्हान देत असता. मी देखील तेच करण्याचा प्रयत्न करत आहे,' असं रोहित म्हणाला.
'इंग्लंडमध्ये खेळण्यासाठी मी माझ्या तंत्रात बदल केले आहेत. मी क्रिजमध्ये जास्त हलण्या-डुलण्याचा प्रयत्न करत नाही. बॉलला शरिराजवळ ठेवून खेळण्याचा प्रयत्न करत आहे,' असं वक्तव्य रोहितने केलं.
रोहितने आऊट झाला त्या हूक शॉटलाही पाठिंबा दिला आहे. जर बॉल मारण्यासारखा असेल, तर मी तो नक्की मारेन, असं रोहितने सांगितलं. तो माझा आवडता शॉट आहे, त्यामुळे मी शॉट खेळलो. पहिल्या तासात इंग्लंडच्या बॉलरनी खराब बॉल टाकला नाही, त्यांच्या बॉलिंगमध्ये अनुशासन होतं, असं रोहित म्हणाला. 97 रनची ओपनिंग पार्टनरशीप झाल्यानंतर भारताने पुढच्या 4 विकेट 15 रनमध्ये गमावल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, Rohit sharma