नॉटिंघम, 8 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या पहिल्या टेस्टच्या पाचव्या दिवशी पावसाने व्यत्यय आणला आहे. भारताला विजयासाठी 157 रनची गरज आहे आणि 9 विकेट अजूनही हातात आहेत. भारताला या आव्हानाचा पाठलाग करणं सोपं जाणार नाही, कारण आधीच एक सत्र पावसामुळे रद्द झालं आहे. तसंच टीम इंडियाला इंग्लंडमध्ये एवढ्या रनचा पाठलाग करताना कधीच विजय मिळाला नाही. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने (Michael Vaughan) यावरून टीम इंडियावर निशाणा साधला आहे.
पाचव्या दिवसाचा खेळ सुरू व्हायच्या आधी मायकल वॉनने दोन ट्वीट केली. पहिल्या ट्वीटमध्ये त्याने बॉलिंगसाठी योग्य दिवस असल्याचं म्हणलं. तर दुसऱ्या ट्वीटमध्ये हवामानाबद्दल बोलताना पाऊस टीम इंडियाला वाचवेल, असं लिहिलं.
नॉटिंघममध्ये पावासचा अंदाज
हवामान विभागाने नॉटिंघममध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहिल आणि पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. नॉटिंघममधलं सध्याचं वातावरण इंग्लंडच्या फास्ट बॉलर्ससाठी अनुकूल आहे, तसंच हवेचा वेगही 22 किमी प्रती तास एवढा असेल, यामुळेही स्विंग बॉलिंगला मदत मिळेल. नॉटिंघममधलं तापमानही 17-18 डिग्रीच्या जवळपास राहिल.
टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा 303 रनवर ऑल आऊट झाला. जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) 64 रन देऊन 5 विकेट घेतल्या. याशिवाय मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. इंग्लंडने दिलेल्या 209 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 52 रनवर एक विकेट गमावली. केएल राहुल (KL Rahul) 26 रन करून माघारी परतला. सध्या रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) प्रत्येकी 12 रन करून खेळत आहेत.
पावसामुळे या टेस्ट मॅचचे आधीच 2 दिवस खराब झाले. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ वेळेआधीच थांबवावा लागला. चौथ्या दिवशी पूर्ण 90 ओव्हरचा खेळ झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england