नॉटिंघम, 6 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. इंग्लंडचा 183 रनवर ऑल आऊट केल्यानंतर भारताने 278 रन केले, यामुळे टीमला 95 रनची महत्त्वाची आघाडी मिळाली. केएल राहुलच्या (KL Rahul) 84 रन, रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) 56 रन तसंच टेलएंडर्सनी केलेल्या धडाकेबाज बॅटिंगमुळे भारताला एवढी आघाडी घेण्यात यश आलं. बुमराहने (Jasprit Bumrah) 28 रन, मोहम्मद शमीने (Mohammad Shami) 13 रन आणि मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) नाबाद 7 रनची खेळी केली.
भारताने याआधी इंग्लंडमध्ये 8 वेळा 75 रनपेक्षा जास्तची आघाडी घेतली आहे. यातल्या 4 वेळा टीम इंडियाचा विजय झाला, तर 4 मॅच ड्रॉ झाल्या. हे रेकॉर्ड बघता टीम इंडियाचा या सामन्यात पराभव होणं जवळपास अशक्य दिसत आहे.
फास्ट बॉलर्सनी घेतल्या 10 विकेट
पहिल्या इनिंगमध्ये भारताच्या फास्ट बॉलर्सनी इंग्लंडच्या सगळ्या 10 विकेट घेतल्या. याआधी इंग्लंडमध्ये तीनवेळा भारताच्या फास्ट बॉलर्सनी अशी कामगिरी केली होती, तेव्हा इंडियाचा पराभव झाला नाही. एक मॅच जिंकण्यात भारताला यश आलं तर दोन मॅच ड्रॉ झाल्या. 4 पैकी 3 वेळा तर नॉटिंघममध्येच भारताच्या फास्ट बॉलर्सनी सगळ्या 10 विकेट मिळवल्या. मागच्या इंग्लंड दौऱ्यातही भारताला नॉटिंघममध्ये विजय मिळाला होता, पण टीमने सीरिज 4-1 ने गमावली होती.
भारत आणि इंग्लंड यांच्यातली इंग्लंडमधली ही 19 वी सीरिज आहे. याआधी झालेल्या 18 सीरिजपैकी 3 सीरिजमध्ये टीम इंडियाचा विजय झाला, तर 14 सीरिज इंग्लंडने जिंकल्या. 2007 साली भारताला इंग्लंडमध्ये शेवटची सीरिज जिंकता आली. इंग्लंडमध्ये दोन्ही टीममधली ही 63 वी टेस्ट आहे. इंग्लंडने 34 टेस्ट जिंकल्या, तर टीम इंडियाला फक्त 7 टेस्ट जिंकता आल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england