नॉटिंघम, 8 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या पहिल्या टेस्टच्या पाचव्या दिवशी पावसाने धुमाकूळ घातला आहे. पाचव्या दिवसाचं पहिलं सत्र पावसामुळे होऊ शकलं नाही, तसंच दिवसभर पावसाचा अंदाज असल्यामुळे मॅच सुरू होण्याची शक्यताही कमी आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी शेवटच्या दिवशी 157 रनची गरज होती आणि हातात 9 विकेट होत्या. भारतीय चाहत्यांना या मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय होईल, अशी अपेक्षा होती, पण इंग्लंडच्या मोसमाने त्यांची निराशा केली आहे. इंग्लंडमधल्या या पावसामुळे भारतीय क्रिकेट चाहते चांगलेच संतापले आहेत.
बीसीसीआयने (BCCI) ट्रेन्ट ब्रीजच्या मैदानाचा फोटो शेयर केला. या फोटोमध्ये खेळपट्टीवर कव्हर घालण्यात आलेली आहेत, तसंच मैदानावर काळे ढग साठल्याचं दिसत आहे. बीसीसीआयने पोस्ट केलेल्या या फोटोवर क्रिकेट चाहत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. इंग्लंडमध्ये क्रिकेटवरच बंदी घालावी, अशी मागणी एकाने केली. तर आणखी एका यूजरने अजूनही आशा सोडलेली नाही. भारताला एका सत्राची गरज आहे, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) मॅच संपवतील, असं एक चाहता म्हणाला.
एका यूजरने तर बीसीसीआयवरच टीका केली. तुमच्यापेक्षा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चांगलं आहे, असं तो म्हणाला. इंग्लंडमध्ये झालेल्या टीम इंडियाच्या मागच्या तिन्ही मॅचमध्ये पावसाने व्यत्यय आणला. 2019 वर्ल्ड कपमध्ये भारत-न्यूझीलंड यांच्यातली सेमी फायनल पावसामुळे दोन दिवस खेळवली गेली, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनलही पावसामुळे सहा दिवस चालली. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या टेस्टमध्येही पावसाने खेळ केल्यामुळे मॅचची ड्रॉच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवारी दिवसभर इंग्लंडमध्ये दिवसभर पावसाची शक्यता आहे. याआधी दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही पावसामुळे संपूर्ण दिवसाचा खेळ होऊ शकला नाही.
भारताला इंग्लंडमध्ये चौथ्या इनिंगमध्ये कधीच 200 रनचा यशस्वी पाठलाग करता आला नाही. यावेळी मात्र टीमकडे ही संधी चालून आली होती, पण पावसाने या सगळ्यावर पाणी टाकलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england