नॉटिंघम, 6 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाने (India vs England) आपली पकड आणखी मजबूत केली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे संपवण्यात आला, तेव्हा इंग्लंडचा स्कोअर 25/0 एवढा झाला होता. डॉमनिक सिबली 9 रनवर आणि रोरी बर्न्स 11 रनवर नाबाद खेळत होते. इंग्लंड अजूनही 70 रनने पिछाडीवर आहे. त्याआधी इंग्लंडचा 183 रनवर ऑल आऊट केल्यानंतर भारताचा 278 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे टीम इंडियाला 95 रनची मोठी आघाडी मिळाली. दिवसाची सुरुवात 125/4 अशी केल्यानंतर केएल राहुल (KL Rahul) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांनी आक्रमक बॅटिंग सुरू ठेवली. 20 बॉलमध्ये 25 रन करून पंत आऊट झाला. यानंतर राहुलने रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) मदतीने भारताला आघाडी मिळवून दिली. केएल राहुल 84 रनवर तर रविंद्र जडेजा 56 रनवर आऊट झाला. टीम इंडियाच्या टेल एंडर्सनीही या सामन्यात धमाकेदार बॅटिंग केली. जसप्रित बुमराहने (Jasprit Bumrah) 34 बॉलमध्ये 28, मोहम्मद शमीने (Mohammad Shami) 13 रन आणि मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) नाबाद 7 रन केले.
इंग्लंडकडून ओली रॉबिनसनने 5 आणि जेम्स अंडरसनने 4 विकेट मिळवल्या. राहुल आणि रोहित (Rohit Sharma) यांच्या ओपनिंग जोडीने भारताला 97 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली, पण रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), विराट कोहली (Virat Kohli) आणि अजिंक्य रहाणे या विकेट भारताने झटपट गमावल्या.
रोहित शर्मा 36 रनवर, पुजारा 4 रनवर आणि विराट कोहली पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाले, तर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 5 रन करून रन आऊट झाला. ओली रॉबिनसने रोहित शर्माच्या रुपात भारताला पहिला धक्का दिला, तर जेम्स अंडरसनने (James Anderson) लागोपाठ दोन बॉलला पुजारा आणि विराटला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
मॅचच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण इंग्लंडचा 183 रनवर ऑल आऊट झाला. जसप्रीत बुमराहने 4, मोहम्मद शमीने 3, शार्दुल ठाकूरने 2 आणि मोहम्मद सिराजने 1 विकेट मिळवली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, Kl rahul, Rishabh pant