मॅनचेस्टर, 10 सप्टेंबर : भारत आणि इंग्लंड यांच्यातली पाचवी टेस्ट (India vs England 5th Test) रद्द करण्यात आली आहे. मॅचच्या एक दिवस आधी टीम इंडियाचे असिस्टंट फिजिओ योगेश परमार (Yogesh Parmar) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती, त्यानंतर खेळाडूंचा गुरुवारी होणारा सरावही रद्द करण्यात आला. तेव्हापासूनच मॅनचेस्टर टेस्टबाबत साशंकता निर्माण झाली होती. बीसीसीआय (BCCI) आणि ईसीबी (ECB) यांच्यात यावरून बराच वेळ चर्चा झाली, यानंतर शुक्रवारी मॅच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही टेस्ट मॅच भविष्यात खेळवली जाईल, असं दोन्ही बोर्डांनी ठरवलं.
मॅनचेस्टर टेस्ट रद्द झाल्यानंतर आता इंग्लंडमधल्या मीडियाने या सगळ्याचं खापर टीम इंडियाचे मुख्य कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यावर फोडलं आहे. टीम इंडियामध्ये कोरोनाची एण्ट्री शास्त्रींमुळे झाल्याचं कारण समोर येत आहे. सगळ्यात पहिले रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं, यानंतर टीमचे बॉलिंग कोच भरत अरुण आणि फिल्डिंग कोच आर.श्रीधर यांची टेस्टही पॉझिटिव्ह आली, त्यामुळे त्यांना लंडनमध्ये क्वारंटाईन व्हावं लागलं.
मागच्या आठवड्यात भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात गेले होते. या कार्यक्रमाला टीम इंडियाचे इतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफही होता. या कार्यक्रमात हॉटेल कर्मचारी वगळता इतर अनेकांनी मास्क लावला नव्हता. या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर चारच दिवसांमध्ये रवी शास्त्री यांना कोरोना झाला. शास्त्रींच्या संपर्कात आलेल्या भरत अरुण, आर.श्रीधर आणि फिजियो नितीन पटेल यांना क्वारंटाईन व्हावं लागलं, पण नितीन पटेल यांची टेस्ट निगेटिव्ह आली.
टीम इंडियाच्या कोचना कोरोना झाल्यानंतर पाचव्या टेस्टआधी पुन्हा एकदा टीममधला आणखी एक जण कोरोनाच्या विळख्यात अडकला. योगेश परमार यांच्या संपर्कात आलेल्या काही खेळाडूंनी मॅनचेस्टर टेस्ट खेळायला नकार दिला. तेव्हापासूनच मॅनचेस्टर टेस्ट रद्द होणार हे जवळपास निश्चित झालं.
इंग्लंडमधलं वृत्तपत्र असलेल्या डेली मेलनेही रवी शास्त्री आणि टीम इंडियाच्या खेळाडूंवर टीका केली आहे. भारतीय कोच आणि खेळाडूंचं वागणं बेजबाबदार पणाचं आहे, अशी टीका डेली मेलमध्ये करण्यात आली आहे. ओव्हल टेस्ट सुरु व्हायच्या दोन दिवस आधी टीम लंडनच्या एका हॉटेलमध्ये बूक लॉन्चिंगच्या कार्यक्रमाला गेली होती. याचा परिणाम सगळ्यांच्या समोर आहे, या कार्यक्रमासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाची परवानगीही घेण्यात आली नव्हती, असं डेली मेलच्या वृत्तात म्हणलं आहे.
बीसीसीआयदेखील शास्त्री आणि विराट कोहलीवर नाराज असल्याचं बोललं जातंय. मागच्या महिन्यात ऋषभ पंतला कोरोना झाला तेव्हा बीसीसीआयने सगळ्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊ नये, असा सल्ला दिला होता. तरीही पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यानंतर बीसीसीआयने विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्यासमोर आपली नाराजी बोलून दाखवली. या कारणामुळे मॅनचेस्टर टेस्ट रद्द होण्याचं खापर टीम इंडिया आणि रवी शास्त्रींवर फुटत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england