मॅनचेस्टर, 10 सप्टेंबर : भारत आणि इंग्लंड यांच्यातली पाचवी आणि अखेरची टेस्ट (India vs England 5th Test) कोरोनाच्या भीतीमुळे रद्द करण्यात आली आहे. टीम इंडियाचे फिजियो योगेश परमार (Yogesh Parmar) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली, यानंतर संपूर्ण टीमला गुरुवारी हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं, तसंच सरावही रद्द करण्यात आला होता. टीम इंडियाच्या सगळ्या सदस्यांची कोरोना टेस्टही करण्यात आली, यात सुदैवाने सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली, या टेस्टचे रिपोर्ट अजूनही आलेले नाहीत. पण दुसऱ्या राऊंडमध्ये केलेल्या टेस्टमध्ये काही खेळाडू पॉझिटिव्ह येण्याची भीती वर्तवण्यात येत, असल्याचं वृत्त ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलं आहे. बीसीसीआयनेही (BCCI) पाचव्या टेस्टसाठी 11 खेळाडूंना मैदानात उतरवणं शक्य नसल्याचं सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
योगेश परमार यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह यायच्या आधी चौथ्या टेस्टदरम्यान हेड कोच रवी शास्त्री, बॉलिंग कोच भरत अरुण आणि फिल्डिंग कोच आर.श्रीधर यांचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.
भारताचा विजय का ड्रॉ?
या सीरिजमध्ये भारतीय टीम 2-1 ने आघाडीवर आहे, त्यामुळे पाचवी टेस्ट रद्द झाल्यानंतर आता सीरिजचा निकाल काय लागणार? याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहेत. इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही सुरुवातीला पाचवी टेस्ट फॉरफिट करण्यात आल्याचं सांगितलं, पण त्यांनी थोड्याच वेळात भूमिका बदलली आणि मॅच रद्द केली असल्याचं अधिकृतरित्या सांगितलं. भारतीय टीममध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे त्यांना मैदानात टीम उतरता येणार नसल्याचं ईसीबीने (ECB) त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात सांगिलं.
आता सीरिजचा निकाल काय लावायचा याचा निर्णय आयसीसी आणि मॅच रेफ्री क्रिस ब्रॉड घेणार आहेत. या दोघांच्या निर्णयात जर टेस्ट मॅच फॉरफिट करण्यात आली, असं सांगण्यात आलं तर इंग्लंडचा या सामन्यात विजय झाला असं घोषित केलं जाईल, पण टेस्ट मॅच रद्द झाल्याचा निर्णय घेण्यात आला तर मात्र सीरिज भारताने जिंकली, असं सांगण्यात येईल.
इंग्लंड क्रिकेट बोर्ड तयार नाही
आयसीसीच्या नियमानुसार जर टीममध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असेल, तर अशी टेस्ट मॅच रद्द केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत ही सीरिज 4 टेस्ट मॅचची करून भारताला 2-1 ने विजेता घोषित केलं जाईल आणि भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचे 26 पॉईंट्स आणि इंग्लंडला 14 पॉईंट्स दिले जातील. इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि त्यांची टीम मात्र यासाठी तयार नसल्याचं वृत्त आहे. हा वाद असाच कायम राहिला तर याची सुनावणी आयसीसीच्या (ICC) डिस्प्युट रिझोल्युशन कमिटीकडे होईल.
भारतीय टीमची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे, त्यामुळे आयसीसीचा कोरोनामुळे टेस्ट रद्द करण्याचा नियमही इकडे लागू होत नाही, असा इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा दावा आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या मागच्या सत्रामध्येही काही पॉईंट्सच्या फरकामुळे इंग्लंडला फायनलमध्ये प्रवेश मिळाला नव्हता. त्यामुळे यावेळी पुन्हा अशी स्थिती निर्माण होऊ नये आणि या टेस्टचे सगळे पॉईंट्स मिळावेत, यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्ड आग्रही आहे.
दुसरीकडे मॅच रद्द झाल्याचं घोषित केलं तर इन्श्युरन्सचे पैसेही मिळणार नाहीत, त्यामुळेही इंग्लंड क्रिकेट बोर्ड भारताकडून सामना फॉरफिट करण्यात आला, या निकालासाठी आग्रही असल्याचं सांगितलं जात आहे. दोन्ही क्रिकेट बोर्ड आणि टीमनी मिळून सामना रद्द केला, तर मॅचसाठीच्या इन्श्यूरन्सचे पैसे मिळणार नाहीत, अशी भीती इंग्लंड क्रिकेट बोर्डाला आहे, त्यामुळे याचा निकाल आता आयसीसीच्या डिस्प्युट रिझोल्युशन कमिटीकडेच लागण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Icc, India vs england