मॅनचेस्टर, 10 सप्टेंबर : भारत आणि इंग्लंड यांच्यातली पाचवी टेस्ट मॅच (India vs England 5th Test) कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे रद्द करण्यात आली. भारतीय टीममध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर खेळाडूंच्या सुरक्षेसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) आणि बीसीसीआय (BCCI) यांनी हा निर्णय घेतला. मॅनचेस्टर टेस्ट रद्द झाल्यानंतर ही टेस्ट नंतर खेळवली जाईल, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं. पण आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या सीईओंनी केल्लाय वक्तव्यामुळे गोंधळ आणखी वाढला आहे. इंग्लिश मीडियाशी बोलताना ईसीसीचे सीईओ टॉम हॅरिसन म्हणाले की, सीरिज आता संपली आहे.
'आता उरलेली टेस्ट मॅच झाली तरी ती या सीरिजचा भाग नसेल. ती एकुलती एक टेस्ट असेल. आमच्यासाठी ही सीरिज संपली आहे. आयसीसी (ICC) या टेस्ट सीरिजच्या निकालाचा निर्णय घेईल,' अशी प्रतिक्रिया ईसीबीच्या सीईओंनी दिली.
गोंधळ संपता संपेना
सुरुवातीला ही टेस्ट रद्द म्हणजे कॅन्सल झाली का फॉरफिट झाली? यावरुन गोंधळ झाला. टॉसला तीन तासांचा अवधी बाकी असताना इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ही टेस्ट भारताने फॉरफिट केली आणि सीरिज 2-2 ने ड्रॉ झाल्याचं सांगितलं, पण अवघ्या काही वेळात ईसीबीने यूटर्न घेत मॅच रद्द झाल्याची प्रतिक्रिया दिली.
बीसीसीआयने रद्द झालेली ही टेस्ट कधी खेळवायची हे दोन्ही बोर्ड मिळून ठरवतील, अशी अधिकृत भूमिका मांडली. पुढच्या वर्षी जुलै महिन्यात भारतीय टीम पुन्हा एकदा इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे, त्यावेळी ही टेस्ट मॅच खेळवली जाण्याची शक्यता आहे.
बॉल आता आयसीसीच्या कोर्टात
टेस्ट सीरिजच्या निकालावरून मात्र आता बीसीसीआय आणि ईसीबी यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे. आयसीसीच्या डिसप्युट रिझोल्युशन कमिटीमध्ये सीरिजचा निकाल काय लागणार, यावर सुनावणी होऊ शकते.
आयसीसीच्या नियमांनुसार टीममध्ये कोरोनाचा शिरकाव झाला, तर मॅच रद्द केली जाऊ शकते. भारतीय टीममध्ये सध्या मुख्य कोच रवी शास्त्री, बॉलिंग कोच भरत अरुण, फिल्डिंग कोच आर.श्रीधर आणि फिजियो योगेश परमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसंच खेळाडूंची पहिली कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तसंच दुसऱ्या टेस्टते रिपोर्ट येणं अजून बाकी आहे. आयसीसीच्या सुनावणीदरम्यान इंग्लंड क्रिकेट बोर्ड भारतीय खेळाडूंमध्ये कोणालाही कोरोना झाला नसल्याचा मुद्दा उचलू शकते.
इंग्लंड फॉरफिटबद्दल आग्रही का ?
इंग्लंड क्रिकेट बोर्ड सामना फॉरफिट झाला याबाबत सुरुवातीला आग्रही का होतं, याचं कारणही समोर आलं आहे. दोन्ही क्रिकेट बोर्डांनी मिळून सामना रद्द केला, असा निर्णय घेण्यात आला असता, तर इंग्लंड क्रिकेट बोर्डाला या मॅचच्या इन्श्युरन्सचे पैसे मिळाले नसते, त्यामुळे ईसीबीने आधी सामना भारताकडून फॉरफिट झाल्याचं सांगितलं.
पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाल्यानंतर लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा विजय झाला, तर लीड्स टेस्टमध्ये इंग्लंडने जोरदार पुनरागमन केलं. पुढे ओव्हलमध्ये झालेली चौथी टेस्ट भारताने जिंकली. त्यामुळे टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर होती. आता आयसीसी भारताने सीरिज जिंकला का नाही, याबाबतचा निर्णय आयसीसी घेणार आहे. आयसीसीचा निकाल येत नाही, तोपर्यंत भारताकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचे 26 पॉईंट्स आणि इंग्लंडकडे 14 पॉईंट्स राहतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Icc, India vs england