Home /News /sport /

IND vs ENG 4th Test : टीम इंडियाने इतिहास घडवला, ओव्हलमध्ये 50 वर्षांनी विजय

IND vs ENG 4th Test : टीम इंडियाने इतिहास घडवला, ओव्हलमध्ये 50 वर्षांनी विजय

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने (India vs England 4th Test) इतिहास घडवला आहे. चौथ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय झाला आहे.

    लंडन, 6 सप्टेंबर : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने (India vs England 4th Test) इतिहास घडवला आहे. चौथ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 157 रननी दणदणीत विजय झाला आहे. याचसोबत भारताने या सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सत्रामध्ये इंग्लंडने तब्बल 6 विकेट गमावल्या. लंचनंतर सुरुवातीलाच रविंद्र जडेजाने हसीब हमीदला बोल्ड केलं, तर जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक रिव्हर्स स्विंगने ओली पोप आणि जॉनी बेयरस्टोला बोल्ड केलं. यानंतर जडेजाने पुन्हा मोईन अलीला शून्य रनवर माघारी पाठवलं. शार्दुल ठाकूरने मॅचमध्ये दुसऱ्यांदा जो रूटला बोल्ड केलं, तर उमेश यादवने क्रिस वोक्सला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. या दिवसाची सुरुवात इंग्लडने 77/0 अशी केली. शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) रोरी बर्न्सला (Rory Burns) 50 रनवर आऊट केलं, तर डेव्हिड मलान (David Malan) रन आऊट झाला. भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर बुमराह, जडेजा आणि शार्दुलला प्रत्येकी 2-2 विकेट घेण्यात यश आलं. या टेस्टच्या पहिल्या दोन दिवसांमध्येच दोन इनिंग संपुष्टात आल्या होत्या, पण यानंतर खेळपट्टीचे रंग बदलले आणि ती बॅटिंगसाठी अनुकूल झाली. इंग्लंडला पहिल्या इनिंगमध्ये 99 रनची आघाडी मिळाल्यानंतर भारताने दुसऱ्या इनिंगमध्ये 466 रनचा डोंगर उभारला. रोहित शर्माचं (Rohit Sharma) शतक आणि पुजारा, पंत आणि शार्दुलने केलेल्या अर्धशतकांमुळे भारताला या स्कोअरपर्यंत मजल मारता आली. रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर यांच्या शानदार कामगिरीमुळे भारताला या सामन्यात विजय मिळवता आला. 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमधली पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाली, तर दुसऱ्या टेस्टमध्ये भारताने विजय मिळवला. यानंतर तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडने धमाक्यात पुनरागमन केलं. आता पुन्हा एकदा भारताने ओव्हलमध्ये विजय मिळवला. 50 वर्षानंतर पहिल्यांदाच भारताला ओव्हलमध्ये विजय मिळाला आहे. 1971 साली भारताने ओव्हलमध्ये याआधी टेस्ट मॅच जिंकली होती. सीरिजची अखेरची टेस्ट 10 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. सीरिज वाचवण्यासाठी आता इंग्लंडला ही मॅच जिंकणं गरजेचं आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england

    पुढील बातम्या