मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : ऋषभ पंतचं खणखणीत शतक, टीम इंडियाने T20 नंतर वनडे सीरिजही जिंकली

IND vs ENG : ऋषभ पंतचं खणखणीत शतक, टीम इंडियाने T20 नंतर वनडे सीरिजही जिंकली

Photo-BCCI

Photo-BCCI

ऋषभ पंतच्या खणखणीत शतकाच्या (Rishabh Pant Century) जोरावर भारताने इंग्लंडचा तिसऱ्या वनडेमध्ये (India vs England 3rd ODI) 5 विकेटने पराभव केला आहे.

मॅनचेस्टर, 17 जुलै : ऋषभ पंतच्या खणखणीत शतकाच्या (Rishabh Pant Century) जोरावर भारताने इंग्लंडचा तिसऱ्या वनडेमध्ये (India vs England 3rd ODI) 5 विकेटने पराभव केला आहे. याचसोबत भारताने वनडे सीरिजही 2-1 ने खिशात टाकली आहे. ऋषभ पंतचं वनडे क्रिकेटमधलं हे पहिलंच शतक आहे. पंतने 113 बॉलमध्ये नाबाद 125 रन केले, यामध्ये 16 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. इंग्लंडने दिलेल्या 260 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. 38 रनवर भारताने 3 तर 72 रनवर 4 विकेट गमावल्या होत्या.

पहिल्या 4 विकेट लवकर गेल्यानंतर ऋषभ पंतने हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) मदतीने भारतीय बॅटिंग सावरली. हार्दिक पांड्याने 55 बॉलमध्ये 10 फोर मारत 71 रनची खेळी केली. पंत आणि पांड्या यांच्यात 133 रनची पार्टनरशीप झाली. रोहित शर्मा-विराट कोहलीनी 17-17 तर सूर्यकुमार यादवने 16 रन केले. शिखर धवन 1 रनवर आऊट झाला. रवींद्र जडेजाने नाबाद 7 रनची खेळी केली. इंग्लंडकडून रीस टॉपलीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर ब्रेडन कार्स आणि क्रेग ओव्हरटन यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर इंग्लंडचा 45.5 ओव्हरमध्ये 259 रनवर ऑलआऊट झाला. बटलरने सर्वाधिक 60 रन केले. तर जेसन रॉयने 41 आणि मोईन अलीने 34 रनची खेळी केली. याशिवाय क्रेग ओव्हरटनने 32 आणि लियाम लिव्हिंगस्टोनने 27 रन केले. भारताकडून हार्दिक पांड्याने 4 विकेट घेतल्या, तर युझवेंद्र चहलला 3 आणि सिराजला 2 तर जडेजाला 1 विकेट मिळाली.

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिज विजयासोबतच भारताचा इंग्लंड दौराही संपला आहे. पाचव्या टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर भारताने टी-20 आणि वनडे सीरिज 2-1 ने जिंकली, तर टेस्ट सीरिज 2-2 ने ड्रॉ केली.

First published:
top videos

    Tags: India vs england, Rishabh pant