साऊथम्पटन, 8 जुलै : भारत आणि इंग्लंड यांच्यात (India vs England 1st T20) गुरूवारी साऊथम्पटनमध्ये अजब योगायोग पाहायला मिळाला. 18 वर्षांपूर्वी एकत्र डेब्यू करणारे भारत आणि इंग्लंडचे खेळाडू पुन्हा एकदा समोरासमोर आले. यातला एक खेळाडू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) तर दुसला एलेक्स वार्फ होता. दिनेश कार्तिक विकेटकीपर म्हणून टीम इंडियाकडून खेळला तर एलेक्स वार्फ (Alex Wharf) हे वेगळ्याच भूमिकेत दिसले. वार्फ या सामन्यात अंपायर म्हणून दिनेश कार्तिकच्या समोर होता.
दिनेश कार्तिकने 5 डिसेंबर 2004 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. ही इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमधली तिसरी मॅच होती. याच सीरिजच्या पहिल्या सामन्यात 1 सप्टेंबर 2004 ला एलेक्स वार्फने पदार्पण केलं होतं. सीरिजच्या तिसऱ्या सामन्यात दोन्ही खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळले होते. यावेळी जेव्हा हे दोघं समोरासमोर आले तेव्हा मात्र वार्फ वेगळ्याच भूमिकेत होते.
दिनेश कार्तिकचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट अजून सुरू आहे, मधल्या काळात तो बरेच वेळा टीम इंडियातून आत बाहेर झाला. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात आरसीबीकडून खेळताना कार्तिकने धमाकेदार कामगिरी केली, त्यामुळे त्याचं टीम इंडियात पुनरागमन झालं. तर एलेक्स वार्फ यांचं आंतरराष्ट्रीय करियर वर्षभरही चाललं नाही. सप्टेंबर 2004 साली पदार्पण केल्यानंतर फेब्रुवारी 2005 साली त्यांनी शेवटचा सामना खेळला. कार्तिक आणि वार्फ यांच्यात 10 वर्षांचं अंतर आहे. कार्तिक 37 वर्षांचा तर एलेक्स वार्फ 47 वर्षांचे आहेत. वार्फना 29व्या वर्षी पदार्पणाची संधी मिळाली, तर कार्तिकने 19व्या वर्षीच पदार्पण केलं.
टीम इंडियाचा विजय
इंग्लंडविरुद्धच्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजय झाला. भारताने दिलेलं 199 रनचं आव्हान पार करताना इंग्लंडचा 148 रनवर ऑल आऊट झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, Team india