सिडनी, 06 जानेवारी: गुरुवारी (7 जानेवारी) भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) यांच्यादरम्यान सिडनी (Sydney test) येथे खेळला जाणारा मेन्स कसोटी सामना (Test match) ऐतिहासिक ठरणार आहे. कारण या सामन्यात इतिहासात पहिल्यांदाच एक महिला अंपायर (woman Umpire) असणार आहे. ऑस्ट्रेलियाची क्लेअर पोलोसाक (Claire Polosak) ही महिला चौथ्या अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. यापूर्वीही तिनं पुरुष एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पंचाची भूमिका पार पाडली होती. त्यावेळी तिनं आंतराष्ट्रीय स्तरावर पहिली महिला पंच बनण्याचा बहुमानही मिळवला होता. 2019 मध्ये नामिबिया आणि ओमान यांच्यात वर्ल्ड क्रिकेट लीग द्वितीय श्रेणीतील सामन्यात तिने ही कामगिरी बजावली होती.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान एकूण चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. तिसर्या सामन्यात पॉल रिफेल आणि पॉल विल्सन हे मैदानातील पंच म्हणून काम करणार आहेत. तर ब्रूस ऑक्सनफोर्ड हे तिसरा (टेलिव्हीजन) पंच म्हणून काम पाहणार आहेत. तसेच डेव्हिड बून मॅच रेफरी असतील. या सामन्यातील चौथा मंच म्हणून ऑस्ट्रेलियाची क्लेअर पोलोसाक ही महिला काम पाहणार आहे. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच कसोटी सामन्यातील पंच पदावर महिलाची नियुक्ती करण्यात आली आहे.
ICC च्या कसोटी सामन्यांच्या नियमांनुसार, चौथा पंचाची निवड देशांतर्गत क्रिकेट मंडळामार्फत आंतरराष्ट्रीय पॅनेलकडून केली जाते. क्लेअर पोलोसाक यांनी 2017 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या पुरुषांच्या प्रथम श्रेणीतील काही सामन्यात पंच म्हणून काम पाहिलं आहे. येथेही तिनं पंच म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिलेचा मान मिळवला आहे.
मैदानात नवीन चेंडू घेऊन येणे, मैदानातील पंचांसाठी पाणी घेऊन जाणे, दुपारच्या जेवणाच्या आणि चहाच्या वेळी खेळपट्टीची पाहणी करणे आणि लाइटमीटरने प्रकाश तपासणे आदी कामं चौथ्या पंचाला करावी लागतात. काही वेळा ऑन-फील्डवरील अंम्पायर काही दुखापत झाली, तर टिव्ही पंच म्हणजे तिसर्या पंचाला मैदानात उतरावं लागतं तर चौथ्या अंपायरला टेलिव्हिजन अंपायर म्हणून काम पाहावं लागतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs Australia