क्रिकेटच्या इतिहासातील फक्त दुसराच सामना, रवी शास्त्रींनी कसोटी केली टाय!

क्रिकेटच्या इतिहासातील फक्त दुसराच सामना, रवी शास्त्रींनी कसोटी केली टाय!

क्रिकेटच्या 142 वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत 2 हजारहून अधिक कसोटी सामने झाले त्यात फक्त 2 सामने टाय झाले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. तीन टी20 सामन्यात अखेरचा सामना आज होणार आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने विंडीज दौऱ्यात धवल यश मिळवलं आहे. आता आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ टी20 मालिका जिंकण्याच्या तयारीत आहे. 33 वर्षांपूर्वी 22 सप्टेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटीत इतिहास घडला होता. त्या इतिहासात भागिदार होते भारतीय संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री.

आतापर्यंत 1877 पासून दोन हजारहून अधिक कसोटी सामने खेळण्यात आले आहेत. यात फक्त दोनच सामने टाय झाले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याआधी 1960 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात इतिहासातील पहिला कसोटी सामना टाय झाला होता.

कसोटी सामना तेव्हाच टाय होतो जेव्हा दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ दुसऱ्या डावात ऑलआउट होतो. त्यावेळी धावसंख्या समान असेल तर सामना टाय होतो. चेन्नईत 1986 मध्ये झालेल्या कसोटीत भारतीय संघ कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली उतरला होता. रवी शास्त्री यांनी एक धाव काढून सामना जिंकण्यासाठी प्रयत्न केला मात्र त्यात यश आलं नव्हतं. पण त्यांना सामना टाय करण्यात यश आलं होतं.

ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 574 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारताने पहिल्या डावात 397 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावात 5 बाद 170 धावांवर डाव घोषित केला होता. भारताला विजयासाठी 347 धावांचे आव्हान मिळाले होते. दुसऱ्या डावात भारताच्या सुनील गावस्कर यांनी 90 तर मोहिंदर अमरनाथ यांनी 51 धावा करून विजयाच्या आशा निर्माण केल्या होत्या.

रवी शास्त्री 45 धावांवर खेळत होते. भारताच्या 344 धावा झाल्या असताना 9 गडी बाद झाले होते. दुसऱ्या बाजुला मनिंदर सिंग खेळत होते. विजयासाठी 4 धावा हव्या होत्या. रवि शास्त्रींनी एका षटकातील एका चेंडूवर दोन धावा घेतल्या. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एकच धाव काढता आली. चौथ्या चेंडूवर मिनिंदर सिंगला धाव घेता आली नाही आणि पाचव्या चेंडूवर तो पायचित झाला. यासह भारताचा दुसरा डाव 347 धावांवर संपुष्टात आला आणि सामना टाय झाला.

कपिल देव आणि डीन जॉन्स यांना संयुक्त सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पहिल्या डावात डीनने 210 धावा केल्या होत्या. तर कपिल देव यांनी 119 धावा केल्या होत्या. दुसरीकडं ऑस्ट्रेलियाचे बॉब सिम्पसन कसोटी क्रिकेटच्या इतिहासात टाय झालेल्या दोन्ही सामन्यांचे साक्षीदार ठरले. पहिल्या सामन्यावेळी एक खेळाडू म्हणून ते मैदानात होते तर दुसऱ्या सामन्यावेळी ते ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक होते.

अमोल कोल्हेंची शिवसेनेवर विखारी टीका, पाहा हा VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: September 22, 2019, 10:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading