नागपूर, 09 फेब्रुवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून सुरू झाला. नागपूरमध्ये सुरु असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १७७ धावात गुंडाळले. त्यानंतर भारताच्या सलामीच्या जोडीने ७६ धावांची भागिदारी केली. भारताचा सलामीवीर केएल राहुल २० धावांवर बाद झाला तर रोहित शर्माने अर्धशतक साजरं केलं. केएल राहुल आल्यानंतर रविचंद्रन अश्विन नाइट वॉचमन म्हणून फलंदाजीला आला. दिवसअखेर भारताच्या १ बाद ७७ धावा झाल्या. अद्याप भारत १०० धावांनी पिछाडीवर आहे.
भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा संघ १७७ धावात गारज झाला. ऑस्ट्रेलियाकडून लॅब्युशेनने सर्वाधिक ४९ धावा केल्या. तर स्मिथने ३७, एलेक्स कॅरीने ३६ आणि हँडसकॉम्बने ३१ धावा केल्या. यांच्याशिवाय एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी आघाडीचे दोन्ही फलंदाज लवकर बाद केले. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅब्युशेन यांनी डाव सावरला होता. पण जडेजाने ही जोडी फोडली आणि त्यानंतर तीन गडी बाद करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला खिंडार पाडलं.
हेही वाचा : आर अश्विनने मोडला कुंबळेचा विक्रम, मुरलीधरननंतर दुसऱ्या क्रमांकावर
रविंद्र जडेजाच्या फिरकीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ १०९ धावात तंबूत धाडला. उपहारानंतर जडेजाने तीन गडी बाद केले. यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था २ बाद ८४ वरून ५ बाद १०९ अशी झाली. जडेजाने मार्नस लॅब्युशेनला यष्टीरक्षक केएस भरतकरवी झेलबाद केलं. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर मॅट रेनशॉला शून्यावर पायचित केलं. तर भारतीय गोलंदाजांच्या संयमाची परीक्षा घेणाऱ्या स्टिव्ह स्मिथचा जडेजाने त्रिफळा उडवला.
पाच गडी बाद झाल्यानंतर एलेक्स कॅरी आणि हँडसकॉब यांनी अर्धशतकी भागिदारी करत पडझड थांबवली. मात्र अश्विनने एलेक्स कॅरीला बोल्ड करत ही जोडी फोडली. त्यानंतर कमिन्सला कोहलीच्या हाती झेल देण्यास भाग पाडलं. जडेजाने मर्फी आणि हँडसकॉम्ब या दोघांनाही पायचित केलं. तर अश्विनने बोलंडला बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आणला. भारताकडून जडेजाने पाच तर अश्विनने तीन गडी बाद केले. मोहम्मद शमी आणि सिराज यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
हेही वाचा : Well Bowled Jaddu! जडेजाच्या गोलंदाजीचं स्टिव्ह स्मिथने केलं कौतुक
तत्पूर्वी, मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाला डावाच्या दुसऱ्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर दणका दिला. त्याने उस्मान ख्वाजाला पायचित केलं. तो फक्त एका धावेवर बाद झाला. तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पुढच्याच षटकात डेव्हिड वॉर्नरचा त्रिफळा उडवून ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. त्याने पाच चेंडूत एक धाव केली. वॉर्नर बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाची अवस्था २ बाद २ अशी होती. यानंतर माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लॅब्युशेन यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला.
सामन्यात भारतीय संघ तीन फिरकीपटूंसह उतरला आहे. नागपूरची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे चौथ्या डावात फलंदाजी करणं भारतासाठी सोपं नसेल. भारताने सूर्यकुमार यादव आणि केएस भरत यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली असून दोघांनीही या सामन्यातून कसोटी पदार्पण केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket