मुंबई, 25 डिसेंबर : भारताचा दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंगने (Harbhajan Singh Retire) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये हरभजनच्या नावावर 417 विकेट आहेत. भारताचा टेस्ट क्रिकेटमधला तो चौथा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे. टेस्टमध्ये अनिल कुंबळे, कपिल देव आणि आर.अश्विन यांनी हरभजन पेक्षा जास्त विकेट घेतल्या. दैनिक जागरणला दिलेल्या मुलाखतीमध्ये हरभजनने त्याचं दु:ख बोलून दाखवलं. मी टेस्ट क्रिकेटमध्ये सहज 500 विकेट घेऊ शकलो असतो, जर मला 400 विकेटनंतर पाठिंबा मिळाला असता, असं हरभजन म्हणाला आहे.
41 वर्षांचा हरभजन भारतासाठी 103 टेस्ट खेळला. 2015 साली श्रीलंकेविरुद्धची टेस्ट हरभजनची शेवटची होती. 2011 नंतर हरभजनने फक्त 5 टेस्ट खेळल्या, यात त्याला 11 विकेट मिळाल्या.
'मला पाठिंबा मिळाला, त्याबद्दल मला चांगलंच वाटलं, पण मला योग्यवेळी पाठिंबा मिळाला असता, तर मी 500-550 विकेट नक्कीच घेतल्या असत्या, कारण जेव्हा मी 400 विकेटचा टप्पा ओलांडला तेव्हा माझं वय 31 होतं. आणखी 3-4 वर्ष खेळलो असतो तर मी 500 विकेट नक्कीच घेतल्या असत्या,' अशी प्रतिक्रिया हरभजन सिंगने दिली.
हरभजन सिंगने भारतीय क्रिकेटपटूला मिळणाऱ्या वागणुकीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. '2001-02 नंतर मला पाठिंब्याची गरज आहे, असं कधीच वाटलं नाही, पण 400 विकेट घेतल्यानंतर मला पाठिंब्याची गरज होती. एवढ्या विकेट घेतल्यानंतरही खेळाडूला पाठिंबा मिळत नसेल, तर आपण आपल्या खेळाडूंची कशी काळजी घेत आहोत? अशी वेळ येते जेव्हा तुम्हाला खेळाडूला आदर द्यायची गरज असते, कारण तो त्यांचा अधिकार असतो,' असं हरभजन म्हणाला.
हरभजन सिंगने मात्र भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचे आभार मानले आहेत. '2001-02 साली सौरव गांगुलीने मला पाठिंबा दिला, त्यासाठी त्याचे आभार. यानंतर मला पाठिंब्याची गरज भासली नाही, पण 2012 साली मला पाठिंब्याची गरज पडली, तेव्हा मला पाठिंबा मिळाला असता तर आज माझं करियर वेगळ्या उंचीवर असतं. 550 विकेट घेतल्यानंतर मी लवकर निवृत्त झालो असतो,' असं वक्तव्य हरभजनने केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Harbhajan singh