मुंबई, 23 फेब्रुवारी : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये आज गुरुवारी सेमीफायनाचा पहिला सामना पारपडणार आहे. या सामन्यात भारताचा सामना तब्बल 5 वेळा महिला टी 20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाशी होणार आहे. फायनल गाठण्यासाठी दोन्ही संघांमध्ये उद्या काटे की टक्कर होणार असून या सामन्यात ऑस्ट्रेलियाच पारडं हे निश्चितच भारतापेक्षा जड आहे. परंतु या सामन्यावेळी जर पाऊस पडला तर मात्र सेमी फायनल सामन्यात मोठा उलटफेर पाहायला मिळेल.
सोमवारी भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना खेळवला गेला होता. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 6 बाद 155 धावा केल्या होत्या. तर आयर्लंड संघ भारताने दिलेलं आव्हान पूर्ण करत असतानाच 9 व्या षटकाच्या सुरुवातीलाच वरुण राजाचे आगमन झाल्यामुळे सामना अर्ध्यातच थांबवण्यात आला. अखेर पाऊस न थांबल्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार भारताचा या सामन्यात 5 धावांनी विजय झाला.
हे ही वाचा : Womens T20 WC : फायनल गाठण्यासाठी भारतासमोर ऑस्ट्रेलियाच तगड आव्हान
असाच पाऊस जर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमी फायनल मुकाबला सुरु असताना झाला तर मात्र ही गोष्ट भारतासाठी मोठ्या अडचणीची ठरू शकेल. याच कारण म्हणजे ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत ग्रुप स्टेजमध्ये 4 सामने खेळले असून सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. यासोबतच ऑस्ट्रेलिया संघाने 8 पॉईंट्स कमवले आहेत. तर भारतीय संघाने 4 ग्रुप स्टेज सामने खेळले असून यापैकी इंग्लंड विरुद्धचा सामना भारताने गमावला होता. त्यामुळे भारतीय संघाने स्पर्धेत 6 पॉईंट्सची कमाई केली आहे. तेव्हा जर सेमीफायनल सामन्यात पाऊस पडला आणि सामना पुन्हा सुरु करता आला नाही तर मात्र भारताचं महिला टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये जाऊन ट्रॉफी जिंकण्याच स्वप्न भंग पावेल. तर ऑस्ट्रेलिया सहजपणे फायनल सामना गाठू शकेल.
मागील महिला टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनल सामन्यातही अशीच परिस्थिती अनुभवण्यास मिळाली होती. जेव्हा सेमी फायनल सामन्यात भारत इंग्लंडचा संघ यांच्यात सेमी फायनाचा मुकाबला होणार होता. परंतु या सामन्यात पाऊस पडल्यामुळे भारताचा स्पर्धेतील पॉईंट टेबल चांगला असल्यामुळे भारतीय संघ थेट महिला टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, ICC Women T20 World Cup, India vs Australia, Indian women's team, Smriti Mandhana, T20 cricket