ICC Women's T20 World Cup Final Aus W vs Ind W : भारताचं स्वप्न भंगलं! फायनल जिंकत ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा झाला वर्ल्ड चॅम्पियन

ICC Women's T20 World Cup Final Aus W vs Ind W : भारताचं स्वप्न भंगलं! फायनल जिंकत ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा झाला वर्ल्ड चॅम्पियन

आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला अंतिम सामना भारताने 85 धावांनी गमावला.

  • Share this:

मेलबर्न, 08 मार्च : आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला अंतिम सामना भारताने 85 धावांनी गमावला. या पराभवासह पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचे भारताचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. तर, ऑस्ट्रेलियानं तब्बल 5 वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचा विक्रम केला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 185 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 99 धावांवर ढेपाळला.

अंतिम सामन्यात भारताला फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. भारताच्या सुमार क्षेत्ररक्षणामुळे ऑस्ट्रेलियानं 184 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारताला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. शेफाली वर्मा फक्त दोन धावांवर बाद झाली. संपूर्ण स्पर्धेत फॉर्ममध्ये असलेल्या शेफाली वर्मावरच भारतीय फलंदाजीची मदार होती. त्यानंतर तानिया भाटिया रिटायर्ड हर्ट झाली तर जेमिमाह शून्यावर बाद झाली. त्यामुळे भारताची अवस्था 2 बाद 8 अशी झाली. त्यानंतर स्मृती मानधनाही 11 धावांवर झेलबाद झाली. भारताला सगळ्यात जास्त अपेक्षा असलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौरला या सामन्यातही चांगली कामगिरी करता आली नाही. हरमनप्रीत कौर 4 धावांवर बाद झाली आहे.

हरमन बाद झाल्यानंतर वेदा कृष्णामुर्ती आणि दीप्ती शर्मा यांनी काही अंशी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र जोनासनने जबरदस्त कॅच घेत वेदा कृष्णामुर्तीला 16 धावांवर बाद केले. त्यानंतर दीप्ति शर्माने 33 धावांची खेळी करत भारताचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र निकोला कॅरीने शर्माला बाद करत भारताला आणखी एक झटका दिला. दीप्ति शर्मा वगळता भारताच्या एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.

तत्पूर्वी एलिसा हिलीने शानदार खेळी करत भारतीय गोलंदाजांचे कंबरडे मोडले. एलिसा हिलीने 39 चेंडूत 192.31च्या स्ट्राईक रेटने 5 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 75 धावा केल्या. एलिसा आणि बेथ मूनी यांनी 115 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णय एलिसा आणि बेथ मूनी या सलामीवीरांनी सार्थकी ठरवला. एलिसा आणि बेथ यांनी पहिल्या चेंडूपासून भारतीय गोलंदाजांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये भारताकडून दोन मोठ्या चूका झाल्या.

प्रथम गोलंदाजी करताना भारताने दीप्ती शर्माच्या तिसऱ्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर शेफाली वर्माने खतरनाक अशा एलिसा हिलीचा झेल सोडला. शेफालीने सोपा कॅच सोडल्यानंतर हिलीने याचा फायदा घेतला. त्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये राजेश्वरी गायकवाडने बेथ मूनीचा कॅच सोडला. त्यामुळं भारतानं पहिल्या 24 ओव्हरमध्ये दोन्ही सलामीवीरांना जीवनदान दिले. अखेर राधा यादवने 75 धावांवर एलिसाला बाद करत ही भागीदारी मोडली. त्यानंतर लगेचच बेथ मूनीने 41 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर दीप्ती शर्माने कर्णधार लॅनिंग आणि अ‍ॅश्ले गार्डनर यांना एकाच ओव्हरमध्ये माघारी धाडले. तर 19व्या ओव्हरमध्ये पूनम यादवने रॅचेल हेन्सला बाद केले. त्यामुळं ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

भारताचा फायनलपर्यंतचा प्रवास

या स्पर्धेत टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आहे. वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 17 धावांनी हरवून स्पर्धेचा विजयी शुभारंभ केला होता. त्यानंतर भारताने बांगलादेशचा 18 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाविरुध्द टीम इंडियाला 3 धावांचा थरारक विजय मिळाला. शेवटच्या लीग सामन्यात भारताने श्रीलंकेला 7 गडी राखून पराभूत केले. उपांत्य सामन्यात इंग्लंडबरोबरचा सामना होता पण पावसामुळे हा खेळ रद्द करण्यात आला आणि गटातील टप्प्यातील सर्व सामने जिंकल्यामुळे टीम इंडियाला अंतिम सामन्याचे तिकीट मिळाले.

ऑस्ट्रेलियाचा फायनलपर्यंतचा प्रवास

या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात निराशाजनक होती. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला भारताकडून पराभव सहन करावा लागला. मात्र त्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियाने कमबॅक करत श्रीलंकेला 5 विकेटनं नमवलं. तर बांगलादेशला 86 धावांनी पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडवर 4 धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. तर, सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला 5 धावांनी नमवत अंतिम सामन्यात प्रवेश केला.

भारत : शेफाली वर्मा, स्मृती मानधना, तानिया भाटिया, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), वेदा कृष्णमूर्ती, दीप्ती शर्मा, शिखा पांडे, राधा यादव, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड,

ऑस्ट्रेलिया : मेग लॅनिंग (कर्णधार), मेगान शूट, एलिसा हिली, रॅचेल हेन्स, एलिस पेरी, जेस जोनासन, डेलिसा किमिन्स, बेथ मूनी, निकोला कॅरे, अ‍ॅश्ले गार्डनर, सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरहॅम, एरिन बर्न्‍स, मोली स्ट्रानो, अ‍ॅनाबेल सदरलँड.

First published: March 8, 2020, 11:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading